Kolhapur Rain : शहरात दिवसभर जोरदार पाऊस

गगनबावड्यासह दोन धरण क्षेत्रांत अतिवृष्टी
Monsoon Update
Monsoon UpdateFile Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : शहरात पुन्हा पावसाने बॅटिंग सुरू केली आहे. मंगळवारी दिवसभर शहरात पावसाच्या सरी बरसत होत्या. अचानक बरसणाऱ्या जोरदार सरींमुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत गगनबावडा गावासह पाटगाव, घटप्रभा या दोन धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली.

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत चढ-उतार सुरू असून, जिल्ह्यातील १३ बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. रात्री ११.४६ वाजता राधानगरी धरणाचा ३ नंबरचा स्‍वयंचलित दरवाजा खुला झाला. धरणातून एकूण २,८२८ क्‍युसेक विसर्ग सुरू आहे. दरम्यान, हवामान विभागाने जिल्ह्याला बुधवारी पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

शहरात दिवसभर अधूनमधून हलक्या, तर काहीकाळ जोरदार सरी बरसल्या. पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ९.९ मि.मी. पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक ५८ मि.मी. पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला. भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, आजरा तालुक्यांतही चांगला पाऊस झाला. पंचगंगा नदीवरील ७, कासारी नदीवरील १, भोगावतीवरील ३, तर दूधगंगा नदीवरील एक बंधारा पाण्याखाली आहे.

पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत चढ-उतार

पंचगंगा नदीची पाणी पातळी सोमवारी रात्री १२ वाजता १९ फूट २ इंचांवर होती. मंगळवारी पहाटे चार वाजेपर्यंत पातळी १९ फूट १ इंचावर पोहोचली. सकाळी दहा वाजेपर्यंत यात वाढ होऊन २० फुटांवर पातळी पोहोचली. सकाळी ११ नंतर पुन्हा पातळीत घट सुरू झाली व सायंकाळी ६ वजाता पातळी १९.६ वर स्थिरावली. यानंतर पातळीत पुन्हा वाढ सुरू झाली आहे. मंगळवारी रात्री १२ वाजता पातळी १९ फूट ९ इंचांवर होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news