Radhanagari Bridge Collapse
कोल्हापूर : कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यात रविवारपासून पावसाची संततधार सुरू असून आज (दि.१६) पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नदी, ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मौजे चौके (ता. राधानगरी) गावातील पूल वाहून गेल्याची घटना घडली आहे. गावाला जोडणारा पूल वाहून गेल्यामुळे संपर्क तुटला आहे.
मागील महिनाभरात दुसऱ्यांदा ही घटना घडली आहे. यापूर्वी सुद्धा हाच पूल वाहून गेला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी घाईगडबडीत भराव टाकून पूल तयार केला होता. दरम्यान, पुलावरून चार चाकी वाहनांची वाहतूक सुरू होती. पूल वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. वाहतुकीचा पूल वाहून केल्याने मौजे चौके येथील केवळ लोखंडी पुलावरून फक्त पायवाट सुरू आहे. लोखंडी पूल सुस्थितीत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
धामणी धरणाच्या घळ भरणी आधी हरप नदी आणि चौके मानबेट येथील कॅनॉल वरील पुल बांधकाम करणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता आधी धरणाची घळभरणी करुण पुलाची कामे पावसाळा सुरू झाला, तरीही अपूर्ण ठेवली होती. परिणामी हा पूल दुसऱ्यांदा वाहून गेल्याने मानबेट व चौके या गावांचा इतर गावांशी संपर्क बंद झाला आहे. मे महिन्यात सुद्धा जोरदार पावसामुळे हा पूल वाहून गेला होता. मात्र, एकाच दिवसात पुन्हा पूल बनविण्यात आला होता. त्यामुळे या रस्त्याच्या दर्जाबाबत सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.