Radhanagari Gaur Attack Farmer Injured
गुडाळ : राधानगरी तालुक्यातील पडसाळी येथील चव्हाणवाडी परिसरात गव्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याला दुखापत झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२९) सकाळी घडली. विलास सीताराम नाके (वय ५०) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
धामणी प्रकल्पाच्या टोकाला व दाजीपूर अभयारण्याच्या सीमेलगत वसलेल्या चव्हाणवाडी परिसरातील नागरिकांचा मुख्य आधार दूध व्यवसाय आहे. येथील बहुतांश तरुण रोजगारासाठी मुंबईकडे स्थलांतरित झाले असून उर्वरित ग्रामस्थ शेती व दुग्धव्यवसायावर उदरनिर्वाह करतात.
शुक्रवारी सकाळी विलास नाके हे नेहमीप्रमाणे गावाच्या पश्चिमेकडील ‘उंबराचा माळ’ परिसरात म्हशी चारण्यासाठी गेले होते. सकाळी साडेआठच्या सुमारास झुडपातून अचानक बाहेर आलेल्या गव्याने त्यांच्यावर पाठीमागून जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला व पाठीला दुखापत झाली.
घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्काळ मदत करत आनंदा नागले यांच्या चारचाकी वाहनातून त्यांना कसबा तारळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमी शेतकऱ्याची विचारपूस केली.