Radhanagari Dam Water Release
गुडाळ : राधानगरी धरणातून गेल्या आठ दिवसांपासून भोगावती नदीपात्रात पाण्याचा एकही थेंब सोडण्यात आलेला नसल्याने नदीचे पात्र अनेक ठिकाणी कोरडे पडले आहे. परिणामी नदीकाठावरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी हस्तक्षेप करून जलसंपदा विभागाला राधानगरी धरणातून तातडीने पाणी सोडण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील (घोटवडेकर) यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
भोगावती नदीकाठावरील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी उभारण्यात आलेल्या जॅकवेलमध्ये पाणी नसल्याने त्या कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे अनेक नळपाणी योजना बंद पडण्याच्या स्थितीत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांजवळ पाणी अडवून ठेवलेल्या ठिकाणांचा अपवाद वगळता नदीपात्रातील बहुतांश भाग कोरडा पडला आहे. काही ठिकाणी पाण्याची लहान डबकी तयार झाली असून त्यातील पाणी साचून राहिल्याने दुर्गंधी पसरू लागली आहे. दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
नागरिकांचे आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता जलसंपदा विभागाने कोणताही विलंब न करता राधानगरी धरणातून नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधूनही जोर धरू लागली आहे.