

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगलीत महापुराने होणारे नुकसान टाळण्यासह महापुराचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला वळविण्यासाठी ३ हजार २०० कोटी रुपयांची पूर नियंत्रण योजना जागतिक बँकेने मंजूर केली आहे. यांतर्गत होणाऱ्या राधानगरी धरणाच्या १५२ कोटी रुपयांच्या कामात वन्यजीव विभागाचा अडथळा आहे. ‘ना हरकत’ प्रमाणपत्रासाठी जलसंपदा विभागाने ‘वन्यजीव’कडे प्रस्ताव पाठविला आहे. ‘ना हरकत’ प्रमाणपत्राशिवाय निविदा प्रक्रिया राबविता येणार नाही.
जागतिक बँक पथकाने ‘ना हरकती’चा मुद्दा उपस्थित केल्यामुळे जलसंपदाने ‘वन्यजीव’कडे प्रस्ताव पाठविला. त्यानंतर नागपूर कार्यालयाकडे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. महापूर नियंत्रण योजनेत पहिल्या टप्प्याची ३० टक्के रकमेची कामे राज्य शासन करणार आहे. राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांच्या शेजारी नव्याने तीन वक्राकार दरवाजे बसविण्यात येणार आहेत. यामुळे पावसाचा अंदाज, धरणातील पाणीसाठा, लाभक्षेत्रात पाण्याची मागणी व महापुराची शक्यता या सर्व गोष्टी गृहीत धरून पाणी सोडण्याचे नियोजन करणे शक्य होणार आहे.
विजेवर चालू-बंद करता येणाऱ्या या वक्राकार दरवाजांमुळे स्वयंचलित दरवाजांच्या काही मीटर खाली जाऊन पाणी सोडणे शक्य होणार आहे. तीन सर्व्हिस गेटला हायड्रॉलिक हॉईस्ट यंत्रणा बसविण्यात येणार आहे. याने दरवाजे उचलल्यामुळे पाणी सोडण्याचे काम सोपे होणार आहे.
पावसाळ्यानंतरच काम सुरू
वन्यजीव विभागाने ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिल्यास तातडीने निविदा प्रक्रिया राबविणे शक्य होणार आहे. त्यामुळे या कामास खर्याअर्थाने पावसाळ्यानंतरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.