Indian Railways file photo
कोल्हापूर

Rising security concerns and robberies on Kolhapur-Pune railway route | रेल्वेचा वेग वाढला; पण सुरक्षेचे काय ?

कोल्हापूर-पुणे मार्गावर दरोडेखोरांची भीती

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : राजेंद्र जोशी

पश्चिम महाराष्ट्रला जोडणाऱ्या रेल्वे मार्गावर कोल्हापूर-पुणे प्रवाशांच्या सुरक्षेची हमी प्रशासन देऊ शकत नसेल, तर आधुनिकीकरणाच्या दाव्यांना अर्थ काय? विद्युतीकरण झाले, दुहेरी मार्गाचे काम पुढे सरकले, गाड्यांची संख्या वाढली. पण प्रवाशांच्या डोक्यावर दरोडेखोरांची टांगती तलवार आहे. अवघ्या काही महिन्यांत तीन दरोड्यांच्या घटनांनी रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढले आहेत.

एक नोव्हेंबरच्या मध्यरात्री सालपा परिसरात मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसवर पडलेला दरोडा हा या मालिकेतील ताजा प्रकार. सिग्नल यंत्रणेत छेडछाड करून धावती गाडी थांबविली. गाढ झोपेत असलेल्या महिला प्रवाशांना लक्ष्य करून दागिने लुटले. तीन डब्यांवर दगडफेकही केली. गाडीत सुरक्षा कर्मचारी तैनात असतानाही ही घटना घडली. ११ एप्रिल रोजी शिरालीजवळ सह्याद्री एक्स्प्रेसला लक्ष्य केले होते. सिग्नल यंत्रणेत छेडछाड करून गाडी थांबविली आणि महिला प्रवाशांचे मंगळसूत्र व अन्य मौल्यवान वस्तू लुटल्या. ४ जुलै रोजी भिलवडी परिसरातही सह्याद्री एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुटले होते.

एकाच रेल्वे मार्गावर काही महिन्यांच्या अंतराने घडलेल्या या तीन घटना केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नाही; रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेतील त्रुटींचा अभ्यास करून गुन्हेगार प्रवाशांना लक्ष्य करीत असल्याचे यातून स्पष्ट होते. मिरज-पुणे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणामुळे रेल्वेची क्षमता व वेग वाढला आहे. मात्र कोल्हापूर-मिरज दुहेरीकरणाचे काम बाकी आहे. रेल्वेचा विस्तार आणि प्रवासी संख्या वाढत असताना सुरक्षा व्यवस्थेचे आधुनिकीकरण मात्र मागे पडले आहे. रेल्वे सुरक्षा दल, लोहमार्ग पोलिस आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कृती आराखडा तयार करावा. संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा, रात्रीची सशस्त्र गस्त, एक्स्प्रेस गाड्यांमध्ये पुरेसे सुरक्षा कर्मचारी आणि सिग्नल यंत्रणेत छेडछाड रोखण्यासाठी अत्याधुनिक तांत्रिक उपाय तातडीने राबविणे आवश्यक आहे.

सुरक्षिततेशी केलेली तडजोड गंभीर ठरेल

रेल्वेचा वेग वाढविणे म्हणजे आधुनिकीकरण नव्हे; प्रवास सुरक्षित करणे हेच आधुनिकीकरण आहे. दरोडेखोर प्रवाशांपर्यंत पोहोचण्याचा वेग वाढवत असताना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा तपास यंत्रणांचा वेग का वाढत नाही? आणखी एका दरोड्याची वाट पाहूनच रेल्वे प्रशासन जागे होणार असेल, तर ती केवळ निष्क्रियता नाही, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेशी केलेली गंभीर तडजोड ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT