पुलाची शिरोली येथील महाडिक पेट्रोल पंपसमोर झालेल्या विचित्र अपघातात कार डिव्हाडरवर जाऊन अडकली  Pudahri
कोल्हापूर

Kolhapur Accident | पुलाची शिरोली येथे विचित्र अपघात; ट्रकच्या धडकेने डिव्हायडर विरुद्ध लेनमध्ये, कार अडकली

ट्रक व कारचे मोठे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

पुढारी वृत्तसेवा

Truck Car Crash Pune Bengaluru Highway

नागाव : पुणे–बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाची शिरोली येथील महाडिक पेट्रोल पंपासमोर गुरुवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास एक विचित्र अपघात घडला. ट्रकच्या जोरदार धडकेमुळे रस्त्यावरील सिमेंटचा डिव्हायडर विरुद्ध बाजूच्या मार्गिकेत फेकला गेल्याने समोरून येणाऱ्या टाटा सफारी कारची त्याला धडक बसली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे–बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महाडिक पेट्रोल पंपासमोर महामार्गाच्या मध्यभागी सिमेंटचे दुभाजक उभारून दोन्ही बाजूंची वाहतूक वळविण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्याकडून बंगळूरच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रकने थेट सिमेंटच्या डिव्हायडरला जोरदार धडक दिल्याने तो डिव्हायडर विरुद्ध लेनमध्ये सरकला. त्याचवेळी कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारी टाटा सफारी कार अचानक रस्त्यात आलेल्या डिव्हायडरवर आदळली आणि त्यावरच अडकून पडली.

या अपघातामुळे ट्रक आणि सफारी कारचे मोठे नुकसान झाले. तसेच महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. काही मिनिटांतच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

अपघाताची माहिती मिळताच शिरोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने आणि रस्त्यावर पडलेला डिव्हायडर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास शिरोली पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT