वडगावच्या बाजारात विविध जातींच्या जनावरांची सुमारे कोटींची उलाढाल झाली (Pudhari Photo)
कोल्हापूर

Pethvadgaon Bazar | म्हैशीला सर्वाधिक सव्वा दोन लाख, बैलजोडीला ६ लाखांची किंमत: वडगावच्या बाजारात साडेचार कोटींची उलाढाल

Kolhapur News | तासगावच्या रावसाहेब पाटील यांच्या बैलजोडीस सहा लाख रुपये विक्रमी किंमत

पुढारी वृत्तसेवा

Pethvadgaon Mahalaxmi Bazar 4 Crore turnover

राजकुमार चौगुले

पेठवडगाव: सुमारे सव्वाशे वर्षाहून अधिक परंपरा असणाऱ्या पेठवडगावच्या महालक्ष्मी जनावरांच्या बाजारात विविध जातींच्या जनावरांची सुमारे कोटींची उलाढाल झाली. अंबप येथील पांडुरंग जाधव यांच्या म्हैशीला सर्वाधिक सव्वा दोन लाख रुपये तर मिणचे येथील सुनील जाधव यांच्या म्हैशीला १ लाख ८१ हजार रुपये विक्रमी किंमत आली. तासगावच्या रावसाहेब पाटील यांची बैलजोडीस सहा लाख रुपये इतकी विक्रमी किंमत आली.

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारच्या जनावरांचा आठवडी बाजार महालक्ष्मी मंदिर परिसरात कोल्हापूर रोडवर भरविण्यात आला होता. नवरात्रोउत्सव काळातल्या पहिल्या सोमवारी जनावरांचा बाजार भरतो. ही परंपरा गेली सव्वाशे वर्षापासुन सुरु आहे. या भरणाऱ्या बाजारात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश आदी राज्यातून शेतकरी बैलजोड्यां, म्हैशी, गायी, बकरी बाजारात खरेदी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येतात. आजच्या बाजारात नायकु भोसले (रा.बावची, ता.वाळवा, जि.सांगली) यांची बारा लाख रुपये किंमतीची बैलजोडी खास आकर्षण ठरली.

म्हैशींचीही आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. म्हैशींच्या किंमती ५० हजारापासून अडीच लाखापर्यंत होत्या. या बाजारात पांडुरंग जाधव (अंबप) तसेच अनिल जाधव व सुनिल जाधव (मिणचे) यांच्या मुरा, म्हैसाणा, पंढरपुरी जातीच्या पंचेचाळीस म्हैशींची विक्री झाली. यापैकी पांडुरंग जाधव यांची मेंढा जातीची म्हैस विलास आंबेकर (मांडुकली ता. गगनबावडा) यांनी सव्वा दोन लाख रुपयांना घेतली. तर अनिल जाधव यांची मुऱ्हा जातीच्या दोन म्हैशी विनायक पाटील (इस्लामपूर ) व उदय लाड (वाळवा) यांनी खरेदी केल्या.

तर गायीमध्ये एचएफ, गीर, जर्सी जातीच्या गायी विक्रीस होत्या. अजित पाटील (भादोले) यांची एचएफ जातीची गाय दादाराव पाटील (कोरेगाव) यांनी १ लाख १० हजार रुपयांना घेतली. बाजारात कोसा, खिलार, जर्सी जातीची खोंडे विक्रीसाठी आली होती. मौजे तासगाव येथील रावसाहेब पाटील यांची बैलजोडी खिलार खरसुंडी जातीची बैलजोडी राजू गिरी (सातारा ) यांनी तब्बल सहा लाखांना खरेदी केली.

प्रताप खोत (देववाडी) यांची चार लाखांची बैलजोडी होती. नामदेव पाटील (कोडोली) यांची साडेतीन लाख रुपयांची खिलार बैलजोडी विक्रीसाठी आणली होती. यावर्षी जनावरांची संख्या वाढली असल्याने बाजारातील उलाढालही वाढली. वडगाव बाजार समितीच्या वतीने पाणी, चारा आदींची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, उपसभापती दिलीप पाटील, सचिव जितेंद्र शिंदे उपस्थित होते.

असाही आनंदोत्सव

जनावरांच्या बाजारात मोठ्या रक्कमेस जनावरांची विक्री झाल्यानंतर गुलालाची उधळण करीत फटाके उडविले जात होते. काही जनावरांचे खरेदीदार मालक हलगीच्या कडकडाटात जनावरांना घेऊन जात होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT