कोल्हापूर

हृदयद्रावक| कोल्हापुरात आजारी आईला दवाखान्यात नेताना युवकाचा अपघाती मृत्यू; आई गंभीर जखमी

अविनाश सुतार

किणी, खोची: पुढारी वृत्तसेवा: भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने आदित्य संभाजी जाधव (वय २२ रा. नानीवळे वसाहत, खोची) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची आई सारिका संभाजी जाधव (वय ४२) या गंभीर जखमी झाल्या. पेठ वडगाव – खोची रस्त्यावर भेंडवडे बसथांबा चौकात आज (दि.१७) दुपारी दीड वाजता हा अपघात झाला.

अपघात कसा घडला ?

  • आदित्य जाधव आजारी आईला भेंडवडे येथे दवाखान्यात घेऊन जात होता.
  • भेंडवडे येथे  ट्रकची दुचाकीला धडक
  • आदित्यचा जागीच मृत्यू झाला.
  • सारिका जाधव गंभीर जखमी झाल्या.

खोची येथील नानीवळे धरणग्रस्त वसाहतीतील आदित्य जाधव हा त्याची आई आजारी असल्याने भेंडवडे येथे दवाखान्यात  घेऊन गेला होता. उपचार घेऊन परतत असताना त्यांची दुचाकी ( क्र.एम एच ०९ बी यु ४४३० ) भेंडवडे येथील गणपती मंदिर समोरच्या चौकात आली. याचवेळी सांगलीकडून सिमेंटच्या पाईप घेऊन वडगावकडे निघालेल्या ट्रक (एम एच ०६ सीए ०९४) ची समोरून दुचाकीला धडक बसली.

यावेळी आदित्य जाधव व सारिका जाधव या दुचाकी गाडीसह ट्रकच्या खाली पडले. यामध्ये आदित्यचा जागीच मृत्यू झाला. तर सारिका जाधव गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल  केले. वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जावेद रोटीवाले, अमन मुजावर, माधुरी वडिंगेकर, पोपट माने यांनी घटनास्थळी पंचनामा केला.अपघाताची घटना मुख्य चौक परिसरात त्यामुळे घडल्यामुळे भेंडवडे, खोची, धरणग्रस्त वसाहत ग्रामस्थ व आदित्यच्या मित्रमंडळींनी मोठी गर्दी केली होती.

अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला

ट्रकचा वेग एवढा जबरदस्त होता की धडकेनंतर या ट्रकने दुचाकीला तीस फुटाहून अधिक अंतर फरपटत नेले. यात दुचाकींचा चक्काचूर झाला. यादरम्यान पेट्रोलची टाकी फुटल्याने दुचाकीला आग लागली. घटनास्थळी उपस्थित तरुणांनी प्रसंगावधान राखत गाडी बाहेर काढून आग विझवली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

खोची- पेठवडगाव रस्त्यावर वाहने वेगात चालवली जात आहेत. त्यामुळे छोटे-मोठे अपघात वारंवार घडू लागले आहेत. वेगाची गती कमी करण्यासाठी गावालगत, चौक, शाळा परिसर येथे गतिरोधक करण्याची मागणी वारंवार ग्रामस्थांतून केली जात आहे. परंतु, ठेकेदाराकडून याला प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. अपघात, धोक्याची सूचना देणारे फलक याठिकाणी लावण्याची गरजआहे. अगोदरच गतिरोधक बनविले असते तर एका युवकाचा जीव वाचला असता अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत होती.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT