Kolhapur Peth Vadgaon Court Employees Protest  Pudhari
कोल्हापूर

Court Employees Strike | शासनाच्या दिरंगाईविरोधात न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; पक्षकारांची गैरसोय

२२ महिन्यांपासून वेतनश्रेणीचा प्रस्ताव प्रलंबित; दिवाणी व फौजदारी न्यायालयातील कामकाजावर परिणाम

पुढारी वृत्तसेवा

Kolhapur Peth Vadgaon Court Employees Protest

पेठवडगाव : न्यायव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाही समान कामासाठी समान वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून (दि. १७) बेमुदत संप पुकारला आहे. या आंदोलनात पेठवडगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील कर्मचारीही सहभागी झाल्याने न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला आहे. त्यामुळे न्यायालयीन कामांसाठी आलेल्या पक्षकार आणि नागरिकांची गैरसोय होत आहे.

उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू करून त्याचा लाभ द्यावा, ही आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. उच्च न्यायालयाने दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांसाठी सुधारित वेतनश्रेणी मंजूर करून त्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मात्र, या प्रस्तावाला २२ महिने उलटूनही मंत्रालय स्तरावर कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. शासनाच्या या दिरंगाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असून, अखेर त्यांनी बेमुदत संपाचा मार्ग स्वीकारला आहे.

महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ (गट-क), महाराष्ट्र स्टेट ज्युडिशियल स्टेनोग्राफर्स असोसिएशन, बेलीफ संघटना, महाराष्ट्र राज्य न्यायालयीन वेल्फेअर कर्मचारी महासंघ आणि महाराष्ट्र राज्य न्यायालयीन गट-ड कर्मचारी महासंघ या संघटनांच्या संयुक्त नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.

समान काम, समान वेतनश्रेणीचा लाभ मिळेपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 'सर्व संवर्गांतील कर्मचारी, एकच निर्धार' या भूमिकेतून राज्यभरातील न्यायालयीन कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. न्याय देण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या न्यायव्यवस्थेतील कर्मचाऱ्यांनाच आपल्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करावे लागत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, या संपामुळे पेठवडगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील नियमित कामकाज विस्कळीत झाले आहे. न्यायालयीन कामांसाठी आलेल्या पक्षकार आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, प्रलंबित प्रकरणांच्या सुनावणीसह अन्य प्रशासकीय कामांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

या आंदोलनात सहाय्यक अधीक्षक एस. ए. स्वामी, गिरिजा टेंगसे, लघुलेखक उदय दुंदेकर, सकलेन शेख, ऋतुजा पाटील, लिपिक समीर फकीर, अश्विनी मिरजकर-पाटील, बेलीफ दिलीप कांबळे, तानाजी पाटील, अनिल ढोणे, अमोल सोनवणे, शिवराज भोसले, ज्ञानेश्वर पाटील, रोहित दांगट आदी कर्मचारी सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT