गारगोटी; रविराज पाटील : पाटगाव येथील मौनी सागर जलाशय परिसरात प्रचंड पाऊस झाल्यामुळे पाटगाव जलाशयाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे वेदगंगा नदीचे पाणी पाटगाव बाजारपेठेत शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणी घरामध्ये शिरण्याची शक्यता निर्माण झाली असून यामुळे नागरिक चिंताग्रस्त बनले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून पाटगाव मौनी सागर जलाशयात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे पाटगाव मौनी सागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहे. रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे पाटगाव जलाशयातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे त्यामुळे सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग होत आहे. वेदगंगा नदी पात्रातील पाण्याच्या सांडव्यातून विसर्ग होणाऱ्या पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन सायंकाळी ४.३० वा. सुमारास पाणी बाजारपेठेत शिरले. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणी घरामध्ये शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जनावरे सुरक्षित स्थळी हलवले आहेत तर घरामध्ये पाणी शिरल्यास प्रापंचिक साहित्याचे नुकसान होऊ नये यासाठी साहित्य सुरक्षित ठेवण्याची लगबग नागरिकांची सुरू आहे. पावसाचा जोर अद्याप कायम असून पाणी पातळीत वाढ होत आहे. परिणामी मौनी महाराज मठाकडे बाजारपेठेतून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.
हेही वाचा