Panhalgad Shiv Smarak
पन्हाळा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक पन्हाळगडावरील शिवस्मारक व परिसर विकासासाठी नगर विकास विभागाने शासन निर्णय जारी करत अतिरिक्त १५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. पहिला १० कोटींचा निधी मंजूर केला होता. आता अतिरिक्त १५ कोटींची तरतूद झाल्याने या शिवस्मारक प्रकल्पासाठी एकूण २५ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.
पन्हाळगड हा जागतिक वारसा यादीतील महाराष्ट्रातील १२ किल्ल्यांपैकी एक असून, पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. पन्हाळा नगरपरिषद हद्दीतील ऐतिहासिक शिवतीर्थ तलाव परिसरातील शिवस्मारकाजवळ बगीचा, पदपथ व अनुषंगिक विकासकामांसाठी हा निधी वापरला जाणार आहे.
आ. चंद्रदीप नरके यांनी गडावर महाराजांचे योग्य स्मारक व सोयी-सुविधा उभारण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीची तात्काळ दखल घेत २५ मार्च २०२५ रोजी स्मारकासाठी पहिला १० कोटींचा निधी मंजूर केला होता. आता अतिरिक्त १५ कोटींची तरतूद झाल्याने या शिवस्मारक प्रकल्पासाठी एकूण २५ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाणार आहे.
निधी मंजुरीबद्दल आ. नरके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खा. धैर्यशील माने आणि नगर विकास विभागाचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे शिवस्मारकाच्या कामाला गती मिळून शिवभक्तांना उत्तम सुविधा उपलब्ध होणार आहेत.
पन्हाळगड हे लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. पन्हाळा नगरवासीय, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शिवभक्तांना विश्वासात घेऊनच या विकासकामांचे पुढील नियोजन केले जाईल.— आ. चंद्रदीप नरके