कोल्हापूर

Panchganga river water hyacinth : पंचगंगेतील जलपर्णी रस्त्यावर; पाणी ओसरताच शेतीला धोका

शिरढोण पुलानजीक जलपर्णीचा प्रचंड साठा; जेसीबीद्वारे त्वरित साफसफाई करून तातडीने हटविण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड : पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत रात्रीतून स्थिरता आल्याने शिरोळ तालुक्यातील शिरढोण पुलानजीक नदीत वाहून आलेली जलपर्णी मोठ्या प्रमाणावर तुंबून थेट रस्त्यावर येऊन पडली आहे. जलपर्णीचा हा प्रचंड साठा पाहता पाणीपातळी कमी झाल्यानंतर लगतच्या शेतीमध्ये विसावण्याची तसेच रस्ता अडवला जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाने पाणी ओसरताच तातडीने जेसीबीच्या साहाय्याने जलपर्णी हटवून शेतकऱ्यांच्या शेतीचे संरक्षण करावे, अशी मागणी होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पंचगंगा नदीला पूर आला असून नदीबरोबर मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून आली आहे. नदीच्या प्रवाहात शिरढोण पुलाजवळ ही जलपर्णी मोठ्या प्रमाणात अडकून राहिली आहे. पाणीपातळी स्थिर झाल्याने जलपर्णीचा साठा आता रस्त्यालगत आणि काही ठिकाणी भररस्त्यावर येऊन पडला आहे.पूर ओसरल्यानंतर नदीतील जलपर्णी मोठ्या प्रमाणावर नदीकाठच्या शेतामध्ये पसरते. त्यामुळे पिकांचे नुकसान होते, शेती मशागतीस अडथळे निर्माण होतात आणि दुर्गंधीसह डासांचा प्रादुर्भाव वाढतो. याशिवाय रस्त्यावर साचलेली जलपर्णी वाहतुकीलाही अडथळा निर्माण करू शकते.

यापूर्वीही अशाच परिस्थितीत प्रशासनाला जलपर्णी हटविण्यासाठी मोठी यंत्रणा राबवावी लागली होती. मात्र यंदा जलपर्णीचे प्रमाण अधिक असल्याने वेळेत उपाययोजना न केल्यास नुकसानाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे पाणीपातळी कमी होताच महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि संबंधित विभागांनी संयुक्तपणे पाहणी करून जेसीबी व इतर यंत्रसामग्रीच्या साहाय्याने शिरढोण पुलानजीक प्रवाहीत पाण्यात तुंबलेली जलपर्णी वाहती करुन तातडीने हटवावी. तसेच नदीकाठच्या शेतीत जलपर्णी पसरण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करून शेतकऱ्यांचे हित जोपासावे, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT