कोल्हापूर

Kolhapur news | पंचगंगा प्रदूषणाविरोधातील आंदोलन चिघळले, कुरुंदवाडला छावणीचे स्वरूप

आंदोलकांना ताब्यात घेताच पोलीस व्हॅन अडवली

पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड : पंचगंगा नदीतील प्रदूषणाच्या प्रश्नावरून आंदोलन अंकुश संघटनेने छेडलेल्या आंदोलनाला सोमवारी नाट्यमय वळण लागले. इचलकरंजी कृष्णा पाणी योजनेच्या केंद्राला टाळे ठोक आंदोलनासाठी निघालेल्या आंदोलकांना पोलीस प्रशासनाने कुरुंदवाड येथील पालिका चौकातच ताब्यात घेतल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस व्हॅनसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. काही आंदोलक थेट वाहनासमोर आडवे झोपले, तर काहींनी दुचाकी आडव्या टाकून व्हॅनचा मार्ग रोखला. त्यामुळे तब्बल दीड तासांहून अधिक काळ पालिका चौकात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.

पंचगंगा नदीत औद्योगिक प्रक्रिया केलेले रासायनिक सांडपाणी सोडून पर्यावरणीय कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप आंदोलन अंकुश संघटनेने केला आहे. संबंधित उद्योगांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इचलकरंजी महापालिकेकडून ठोस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ संघटनेने मजरेवाडी येथील इचलकरंजी कृष्णा पाणी योजनेच्या केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता.

या आंदोलनासाठी कार्यकर्ते कुरुंदवाड येथील पालिका चौकात एकत्र आले होते. मोर्चा मजरेवाडीकडे रवाना होण्यापूर्वीच पोलिसांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन प्रमुख आंदोलकांना ताब्यात घेतले. यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस व्हॅनचा मार्ग अडवत जोरदार घोषणाबाजी केली. काही आंदोलक वाहनासमोर आडवे झोपले, तर इतरांनी दुचाकी रस्त्यात टाकून व्हॅन पुढे जाऊ न देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आंदोलक आणि पोलीस प्रशासन यांच्यात चर्चा सुरू करण्यात आली. आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच पोलीस व्हॅन दीड तासाहून अधिक काळ पालिका चौकात अडकून पडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT