House Pudhari
कोल्हापूर

Kolhapur news : ‘माझ्या घराचा सर्वे का केला नाही?’; लेखी उत्तर मिळेपर्यंत ग्रामपंचायतीतच बसण्याची भूमिका

काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) सर्वेक्षण २०२४ अंतर्गत लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या...

पुढारी वृत्तसेवा

कासारवाडी : करवीर तालुक्यातील सादळे-मादळे येथे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) २०२४ च्या लाभार्थी यादीवरून तणाव निर्माण झाला आहे. आपल्या नावाचा यादीत समावेश का करण्यात आला नाही, याचे लेखी उत्तर मिळावे, या मागणीसाठी माजी ग्रामपंचायत सदस्य अमीर पटेल यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. लेखी उत्तर मिळेपर्यंत ग्रामपंचायतीतच बसून राहण्याची भूमिका त्यांनी घेतल्याने गावात खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) सर्वेक्षण २०२४ अंतर्गत लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर नागरिकांनी ग्रामपंचायतीत जाऊन यादीत आपले नाव आहे की नाही, याची खात्री केली. यावेळी अमीर पटेल यांनी आपले साधे घर असतानाही आपले नाव यादीत का समाविष्ट करण्यात आले नाही, अशी विचारणा ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली.

यावर त्यांच्या घराचा सर्वे ग्रामसेवकांनी केला नसल्याचे उत्तर देण्यात आले. मात्र, आपल्या घराचा सर्वे का करण्यात आला नाही, याचे लेखी उत्तर द्यावे, अशी मागणी पटेल यांनी केली. त्यावर ग्रामपंचायत प्रशासनाने सात दिवसांनंतर लेखी उत्तर देण्याचे सांगितले. त्यामुळे ‘सात दिवस मी येथेच बसून राहतो,’ अशी भूमिका अमीर पटेल यांनी घेतली. दरम्यान, पात्र नागरिकांना डावलून ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या मर्जीतील लोकांची यादी तयार केल्याचा आरोपही अमीर पटेल यांनी केला आहे. या आरोपामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

‘चेहरा पाहण्यात ग्रामसेवकाला इंटरेस्ट नाही’ असे उत्तर दिल्याचा आरोप

माझ्या घराचा सर्वे का केला नाही, अशी विचारणा करण्यासाठी ग्रामपंचायतीत गेलो असता, एका ग्रामपंचायत सदस्या यांनी ‘तुमचा चेहरा पाहण्यात ग्रामसेवकाला इंटरेस्ट नाही,’ असे उत्तर दिल्याचे अमीर पटेल यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT