

कोल्हापूर : एक लेक जन्माला येते, तेव्हा केवळ एक अपत्य नव्हे, तर साक्षात एका घराण्याचे भवितव्य, संस्कृती आणि प्रकाश जन्माला येतो. आजची ‘ती’ आपल्या कर्तृत्वाने आकाशाला गवसणी घालत घराचा आणि देशाचा स्वाभिमान ठरत आहे. समाजात मुलगा-मुलगी भेद नष्ट करून 'मुलगी हाच आमचा अभिमान' हा विचार प्रत्यक्ष जगणाऱ्या पालकांचा सन्मान करण्यासाठी दैनिक 'पुढारी’च्या वतीने आयोजित ‘मुलगी हवी हो!’ हा विशेष गौरव सोहळा गुरुवारी (दि. २७) रंगणार आहे.
खासबाग मैदानाजवळील गोविंदराव टेंबे सभागृहात (जुना देवल क्लब) सकाळी १०.३० वाजता हा सोहळा पार पडेल. या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक मे. गोपिनाथ अनंत चिपडे सराफ, भाऊसिंगजी रोड आणि व्हिनस कॉर्नर, सहप्रायोजक सारस्वत को-ऑप. बँक, भंडारी ग्रुप असून व्ही. जे. पाटील फाऊंडेशन आणि जिल्हा परिषद, कोल्हापूर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून महापौर रूपाराणी निकम, कोल्हापूर जि. प. अध्यक्षा शिल्पा खोत असतील. मे. गोपिनाथ अनंत चिपडे सराफच्या श्यामला चिपडे, संजीवनी चिपडे, सारस्वत को-ऑप. बँक कोल्हापूरच्या होलसेल बँकिंग प्रमुख धनश्री काळे, भंडारी ग्रुप कोल्हापूरच्या मंगल भंडारी, व्ही. जे. पाटील फाऊंडेशनच्या संजीवनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
कर्तृत्वाला बळ देणाऱ्या पालकांचा सन्मान
केवळ एक किंवा दोन कन्यारत्नांचे आनंदाने स्वागत करून त्यांना उच्च शिक्षण, संस्कार आणि बळ देत यशाच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या आदर्श पालकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे. हा केवळ सत्कार सोहळा नसून, स्त्री जन्माचे स्वागत करणारी आणि स्त्री सक्षमीकरणाचा नवा अध्याय लिहिणारी ही एक सामाजिक चळवळ ठरत आहे. स्त्री जन्माचा उत्सव साजरा करणाऱ्या आणि समाजाला नवी प्रेरणा देणाऱ्या या प्रेरणादायी सोहळ्यास शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाचा तपशील
वार व तारीख : आज, गुरुवार, दि. २७ ऑगस्ट
वेळ : सकाळी १०.३० वाजता
स्थळ : गोविंदराव टेंबे सभागृह (जुना देवल क्लब), खासबाग मैदानाजवळ, कोल्हापूर
विशेष व्याख्यान
या सोहळ्यात शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांचे ‘स्त्री सक्षमीकरण’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.