शिरढोण : टाकवडे (ता. शिरोळ) येथे बेकायदेशीर गावठी दारू विक्रीसह विविध अवैध धंदे पुन्हा सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीने जिल्हा पोलिस प्रमुख आणि शिरोळ पोलिस ठाण्याकडे लेखी तक्रार करून कठोर कारवाईची मागणी केली होती. मात्र तक्रारीनंतर काही दिवस धंदे बंद राहून पुन्हा पूर्ववत सुरू झाल्याने पोलिस कारवाईच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
गावात वाढत्या अवैध व्यवसायांमुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त केली जात होती. भूमसेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल शंकर फडके आणि अमृत सावंत यांनी ग्रामपंचायतीकडे निवेदन देऊन गावातील बेकायदेशीर धंद्यांकडे लक्ष वेधले होते. या निवेदनाची गंभीर दखल घेत ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत विषयावर चर्चा करण्यात आली. सभेत पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करून अवैध धंद्यांना आळा घालावा, असा ठराव मंजूर करण्यात आला.
तक्रारीनंतर पोलिसांनी काही ठिकाणी कारवाई केल्याने अवैध धंदे दोन दिवस बंद राहिल्याचे सांगितले जाते. मात्र त्यानंतर पुन्हा गावठी दारू विक्री आणि इतर अवैध व्यवसाय सुरू झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही कारवाई केवळ दिखाऊ होती का, असा सवाल उपस्थित होत आहे.
दारूबंदी असलेल्या गावातच गावठी दारू सहज उपलब्ध होत असल्याने तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जात असल्याची चिंता व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीने अधिकृत तक्रार करूनही अवैध धंदे पुन्हा सुरू होणे ही गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संबंधित यंत्रणांनी नियमित छापेमारी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
ग्रामस्थांचा सवाल अनुत्तरितच
ग्रामपंचायतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केल्याचे सांगितले जात असले तरी अवैध धंदे पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दारूबंदी असलेल्या गावात गावठी दारूची विक्री कशी सुरू राहते, तसेच कारवाईनंतरही संबंधितांवर वचक का बसत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अवैध धंद्यांना नेमके कोणाचे पाठबळ आहे, याची निष्पक्ष चौकशी करून ठोस कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.