शिरढोण : शिरढोण (ता. शिरोळ) येथील नळपाणी पुरवठा विभागाचा अत्यंत निष्काळजी आणि बेजबाबदार कारभार सध्या उघडकीस आला असून, ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गावातील तब्बल १३ हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पाणी शुद्धीकरणासाठी अत्यावश्यक असलेली तुरटी खरेदी न करताच गावाला पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे.
नियमांनुसार दररोज सुमारे २० किलो तुरटी व ९ किलो टीसीएलचा वापर करणे आवश्यक असताना, प्रत्यक्षात केवळ टीसीएलचा वापर करून पाणी शुद्ध केल्याचा दिखावा केला जात आहे. त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्था सुरक्षित असल्याचे केवळ कागदावरच दिसून येत आहे. या प्रकारामुळे पोटदुखी, जुलाब, उलटी तसेच त्वचारोग पसरण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
शिरढोण गावासाठी उभारण्यात आलेल्या २ लाख ७० हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचा परिसर अत्यंत अस्वच्छ असून, आजूबाजूला उघड्या गर्ता व कोणतीही संरक्षण व्यवस्था नसल्याने हा भाग अपघातास निमंत्रण देणारा ठरला आहे. देखभाल व स्वच्छतेकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्था केवळ दोन कर्मचाऱ्यांवर अवलंबून असून, त्यांना तुटपुंज्या पगारात दिवसाचे तब्बल १८ तास काम करावे लागत आहे. गावातील अनेक ठिकाणी पाईपलाईनला गळती लागून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही.
कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी वरिष्ठांना परिस्थितीची माहिती दिली असतानाही ग्रामपंचायत पदाधिकारी व जबाबदार अधिकारी प्रत्यक्ष पाहणीस फिरकत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. तातडीने सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
शिरढोणमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक असलेली तुरटी खरेदीच करण्यात आलेली नाही. केवळ टीसीएलच्या आधारे गावाला पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू आहे. संपूर्ण नळपाणी पुरवठा व्यवस्था फक्त दोन कर्मचाऱ्यांवर चालवली जात असून त्यांच्यावर प्रचंड कामाचा ताण आहे. पाण्याच्या टाकीचा परिसर अस्वच्छ व असुरक्षित अवस्थेत असून अपघाताचा धोका वाढला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून आंदोलनाची शक्यता निर्माण झाली आहे.