St Bus Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur St Bus news शिरढोणमध्ये सकाळची बससेवा बंद; विद्यार्थी,नोकरदार यांची गैरसोय; आंदोलनाचा इशारा

द्यार्थी, पालक व नागरिकांच्या सहभागातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे

पुढारी वृत्तसेवा

शिरढोण : शिरढोण (ता.शिरोळ) येथे सकाळच्या वेळेत एसटी बससेवा उपलब्ध नसल्याने शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार व व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. याबाबत इचलकरंजी व कुरुंदवाड एसटी डेपोकडे अनेक वेळा निवेदने देऊन तसेच पाठपुरावा करूनही बससेवा सुरू करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पूर्वी सुरू असणाऱ्या लांजा, रत्नागिरी,पावस, गगनबावडा या गाड्या पूर्ववत कराव्यात अशी आग्रही मागणी होत आहे.

१५ जूनपासून शाळा व महाविद्यालये सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणी अधिक तीव्र होणार आहेत. सकाळी वेळेत बस नसल्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून पालकांवर आर्थिक भार पडत आहे. नोकरीसाठी इचलकरंजी, जयसिंगपूर, कुरुंदवाड व इतर ठिकाणी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वेळेत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

गावातील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाले असून बस वाहतुकीसाठी कोणताही अडथळा नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तरीही संबंधित विभागाकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वारंवार मागणी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली आहे. शाळा व महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच सकाळची बससेवा सुरू करावी, अन्यथा विद्यार्थी, पालक व नागरिकांच्या सहभागातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

"शिरढोण गावातील विद्यार्थी, नोकरदार आणि नागरिकांची सकाळच्या बसअभावी मोठी गैरसोय होत आहे. रस्ता रुंदीकरण पूर्ण झाले असून बससेवा सुरू करण्यास कोणताही अडथळा नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन बस सुरू करावी. अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल."
— सूर्यकांत कोळी माजी सरपंच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT