कासारवाडी : पाडळी (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या सन २००५-०६, २००७-०८ आणि २००९-१० या आर्थिक वर्षांतील मासिक सभांचे मूळ 'प्रोसिडिंग बुक' (इतिवृत्त वही) गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शासकीय अभिलेख जतन करण्यात कसूर केल्याप्रकरणी आणि जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली केल्याप्रकरणी हातकणंगले पंचायत समितीचे गट विकास अधिकार डॉ. एस. ए. मोकाशी यांनी पाडळीचे प्रशासक व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना तात्काळ पोलिसात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
या कारवाईमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून दोषी ग्रामसेवक आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. येथील राहुल पाटील यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर व अतिरिक्त विभागीय आयुक्त (पुणे विभाग) यांच्याकडे ग्रामपंचायतीच्या मासिक सभांचे प्रोसिडिंग बुक उपलब्ध नसल्याने आणि शासकीय आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याबाबत त्यांनी दाद मागितली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले होते यावरून हातकणंगले पंचायत समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत अखेर थेट फौजदारी कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर होणार्या कारवाईकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
ग्रामसेवकांवर शिस्तभंगाची कुऱ्हाड?
ग्रामविकास विभागाच्या नियमानुसार, ग्रामपंचायतीचा कारभार आणि दप्तर हस्तांतरण न करताच निष्काळजीपणा करणाऱ्या तत्कालीन जबाबदार ग्रामसेवकाविरुद्ध कडक कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आला आहे. नवीन ग्रामसेवकांकडे कार्यभार सोपवताना मासिक सभा इतिवृत्त हस्तांतरित केले नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
बीडीओंचे कडक आदेश
हातकणंगले गट विकास अधिकारी डॉ. एस. ए. मोकाशी यांनी मासिक सभा प्रोसिडिंग हा ग्रामपंचायतीचा महत्त्वाचा अभिलेख आहे. तो गहाळ झाल्याप्रकरणी प्रशासक आणि ग्रामपंचायत अधिकारी, पाडळी यांनी कायदेशीर तरतुदींचे पालन करून तातडीने पोलिसात गुन्हा नोंदविण्याचा आदेश दिला आहे.