

चंद्रपूर : गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातील कथित जलसिंचन गैरव्यवहार प्रकरणात तब्बल १५ वर्षांनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत मंगळवारी (दि. ९ ) सायंकाळी ५ वाजता ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणात तत्कालीन जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकारी, कंत्राटदार आणि दोन कंपन्यांचा समावेश आहे.
एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अनिल मोहनरेड्डी जिट्टावार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीनुसार, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाच्या उजवा मुख्य कालवा विभागातील डी-७ वितरिकेवरील मातीकाम व बांधकामाच्या कामासाठी २००९-१० दरम्यान राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता करण्यात आली. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर एसीबीकडून सखोल चौकशी करण्यात आली होती.
सदर कामाची मूळ निविदा किंमत १२.६३ कोटी रुपये होती. निविदा प्रक्रियेनंतर मे. सुमेधा अर्थमूव्हर्स कंपनी अँड मे. सुवर्णा इंटरप्रायझेस (जे.व्ही.), पुणे यांना काम देण्यात आले. वाटाघाटीनंतर ही निविदा मूळ अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा ९.७५ टक्के अधिक दराने मंजूर करण्यात आली. त्यानुसार अंतिम कराराची रक्कम १३ कोटी ८६ लाख ८९ हजार २८३ रुपये निश्चित करण्यात आली.
चौकशीत संबंधित कंत्राटदारांनी पात्रता मिळविण्यासाठी सादर केलेली चारही पूर्वानुभव प्रमाणपत्रे बनावट असल्याचे उघड झाले. प्रमाणपत्रांची पडताळणी केल्यानंतर संबंधित कार्यालयांनी अशी प्रमाणपत्रे कधीही जारी केली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे खोट्या कागदपत्रांच्या आधारे निविदा पात्रता मिळवून शासनाची फसवणूक केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणात तत्कालीन कार्यकारी अभियंता सुधाकर आत्माराम घेंगारे, अधीक्षक अभियंता संजय लक्ष्मण खोलापूरकर, मुख्य अभियंता सोपान रामराव सूर्यवंशी, देवेंद्र परशुराम शिर्के, मनोजकुमार प्राणनाथ अंब्रोल तसेच मे. सुमेधा अर्थमूव्हर्स कंपनी आणि मे. सुवर्णा इंटरप्रायझेस कंपनी यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३४, ४२०, ४६५, ४६६, ४६८, ४७१ तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १३(१)(ड) व १३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोसीखुर्द प्रकल्पातील कथित गैरव्यवहारांवर सुरू असलेल्या कारवाईत ही महत्त्वाची घडामोड मानली जात असून, पुढील तपासात आणखी बाबी समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.