कोल्हापूर

MPSC PSI Result | कोल्हापूर : अन् शिवप्रसादचं घर आनंदानं डोलू लागलं! पाचवडेच्या युवकाचं पीएसआय परीक्षेत यश

निलेश पोतदार

गारगोटी : पुढारी वृत्तसेवा,  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेण्यात आलेल्या परि‌क्षेत उप निरीक्षकपदी भुदरगड तालुक्यातील पाचवडे येथील शिवप्रसाद भिकाजी भांदिगरे याची निवड झाली आहे. त्याने पाचवडे गावातला पहिला पीएसआय होण्याचा मान मिळवला आहे. (MPSC PSI Result)

काल निकाल जाहीर होताच शिवप्रसादचं घर आनंदाने डोलू लागले. गावकऱ्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यानं जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर MPSC परीक्षा क्रॅक केली आहे. त्याचे वडील कोतवाल म्हणून काम करतात. तर आई शेती, दुभती जनावरे सांभाळून घराचा डोलारा सांभाळ‍त आहे. मुलाने शिकून अधिकारी व्हावी, अशी दोघांची इच्छा होती. ती आता त्यांच्या मुलाने पूर्ण केली आहे.

शिवप्रसादनं खूप कष्ट घेतलं. त्याचं फळ त्याला मिळालं, अशी प्रतिक्रिया त्याच्या पालकानी व्यक्त केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यानं ४ थी पर्यंतचं शिक्षण पाचवडे गावातील प्राथमिक शाळेत, सातवीपर्यंतचं शिक्षण नाधवडे गावात, त्यानंतरचं शिक्षण जवाहर हायस्कूल निळपण इथं, गारगोटीत आयसीआरईत डिप्लोमा पूर्ण केला. तर इंजिनिअरिंगचं पदवी शिक्षण जयसिंगपूरात पूर्ण केलं. खडतर प्रवास करून गेली काही वर्षे तो पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होता. MPSC मधून अत्यंत चिकाटीनं त्यानं हे यश मिळवलं आहे. हे यश मिळवणारा तो गावातील पहिलाच युवक आहे. त्यामुळे गावकऱ्यांनाही आनंद झाला आहे. शिक्षण, कला, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात नावाजलेल्या या गावच्या शिरपेचात या यशानं आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. हे यश त्याच्या कुटुंबियांसह समस्त गावकऱ्यांसाठी अभिमानस्पद असून या यशाबद्दल ग्रामस्थ आणि नातेवाईकांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (MPSC PSI Result)

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT