कोल्हापूर

Kolhapur News: असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडियाच्या (ASI’) ‘राजदंडाची’ची निर्मिती कोल्हापूरमध्ये

मोनिका क्षीरसागर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा: 'असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया' (ASI) ही शल्यचिकित्सकांची जगातील दुसऱ्या क्रमांकांची अव्वल संस्था म्हणून ओळखली जाते. अशा संस्थेसाठी नव्यानेच राजदंड (ज्ञानदंड/सेंगोल) बनविण्यात आला असून, कोल्हापूर मधील 'श्री प्रोसेस वर्क्स्च्या' सागर विलास बकरे यांनी या राजदंडाचे डिझाईन आणि निर्मितीचे काम केले आहे. (Kolhapur News)

'असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया' ची स्थापना १९३८ मध्ये करण्यात आली असली तरी तब्बल ८५ वर्षांनी संस्थेसाठी राजदंड घडवण्यात आला, निमित्त होते विशाखापट्टणम येथे आयोजित ८३ वी ASICON या वार्षिक परिषदेचे. कोल्हापूर मधील नामवंत सर्जन डॉ. प्रतापसिंह वरुटे हे 'असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया' चे मा .सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या संकल्पनेतूनच हा 'राजदंड' घडविण्यात आला, त्याला मूर्त स्वरूप देण्याचे काम 'श्री प्रोसेस वर्क्स्'ने केले. (Kolhapur News)

हा संपूर्ण राजदंड तांब्याच्या धातूमध्ये घडविण्यात आला असून, यावरती चांदी आणि सोन्याचे मुलामे देण्यात आले आहेत. राजदंड प्रदर्शित करण्यासाठी विशेष पेटी आणि संचलनाच्यावेळी राजदंडाला आधार देणारा चामडी कमरपट्टा देखील बनवण्यात आला आहे.

Kolhapur News: 'श्री प्रोसेस वर्क्स'ने बनवलेल्या राजदंडाची खासियत

राजदंड बनवताना 'कॅड्युसियस' या डॉक्टरांच्या मूळ ग्रीक लोगोवरून डिझाईनची प्रेरणा घेण्यात आली. मुख्य आधार दर्शवणारा दंड, गती आणि कार्यक्षमता दर्शवणाऱ्या पंखांचा वापर डिझाईन मध्ये करण्यात आला आहे. याचबरोबर भारतीय संस्कृतीशी मेळ घालत असताना अमृत कलशाचे घडकाम आणि जीवन वेल यांच्या नक्षीचा वापर यामध्ये केलेला आहे. याचबरोबर शल्यचिकित्सक आणि रुग्ण यांचे दृढ नाते दर्शवणारे निष्णात हात आणि हृदयाकृती यांचा वापर कलात्मक पद्धतीने या राजदंडावरती उमटवण्यात आला आहे.

अनेक कार्यक्रमात 'राजदंड' प्रदर्शन करण्याची प्रथा

राजदंड/सेंगोल हे अधिकार, परंपरा आणि शैक्षणिक उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. राजदंड धारण करण्याची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. दीक्षांत समारंभ, संस्था प्रारंभ किंवा उद्घाटन यांसारख्या औपचारिक कार्यक्रमांदरम्यान त्याचे प्रदर्शन करण्याची प्रथा आहे. संस्थेचे मानद सेक्रेटरी या नात्याने विशाखापट्टणम येथे झालेल्या ASI च्या ८३ व्या ASICON या वार्षिक परिषदे मध्ये हा राजदंड धारण करण्याचा मान डॉ. प्रतापसिंह वरुटे यांना मिळाला.

राजदंडासह अनेक कलाकुसरीची निर्मिती

या पूर्वी देखील सोलापूर युनिव्हर्सिटी, डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी-नवी मुंबई, डी. वाय. पाटील- कोल्हापूर, बी.एल.डी.ई.युनिव्हर्सिटी-विजापूर यांच्यासाठी श्री प्रोसेस वर्क्स् ने वैशिष्ठयेपूर्ण राजदंड (ज्ञानदंड) घडवले आहेत. कोल्हापूरची श्री आंबाबईची सोन्याची पालखी व मोरचेल यांच्या डिझाइनमध्ये देखील त्यांचे योगदान राहिले आहे. असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडियाचा 'राजदंड' घडवण्यासाठी सारिका बकरे, श्रीकांत पेटकर, अजित तांबेकर, रतन पाटील, प्रभाकर सुतार, नवयुग लेदर चे चर्मकार सागर कांबळे यांनी कौशल्यपूर्ण योगदान दिले, त्यांना असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. संजय जैन यांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT