कोल्हापूर

Kolhapur news | १० लाखांचे तलाठी कार्यालय थेट विहिरीच्या दारात

शिरढोण ग्रामपंचायतीचा अजब कारभार...

पुढारी वृत्तसेवा

शिरढोण : शासकीय कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना तलाठी कार्यालयात जाताना ‘जीव मुठीत धरून’ जावे लागणार असल्याचे चित्र शिरढोण येथे पाहावयास मिळत आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या महसूल निधीतून १० लाख रुपये खर्चून उभारण्यात येत असलेले तलाठी कार्यालय चक्क जुन्या गावविहिरीच्या कडेला बांधण्यात आले आहे. विशेष म्हणजे कार्यालयाचा मुख्य दरवाजाच विहिरीच्या दिशेने ठेवण्यात आल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

केवळ निधी खर्च करण्याच्या उद्देशाने कोणतीही दूरदृष्टी न ठेवता हे बांधकाम सुरू केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी एक पाऊल चुकविले तर थेट विहिरीत जाण्याची वेळ येईल, अशी उपरोधिक प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. सदर कामाला वर्षभराचा कालावधी लोटला असला तरी बांधकाम अद्याप अर्धवट अवस्थेत आहे. १० लाखांचा निधी खर्चूनही नागरिकांच्या सुरक्षिततेचा व सोयीसुविधांचा विचार न झाल्याने या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

जागेअभावी कोट्यवधींचा निधी लटकला

शिरढोणमध्ये सांडपाणी योजना, जलजीवन मिशनसह अन्य विकासकामांसाठी मंजूर झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी जागेअभावी रखडला आहे. नियोजनशून्य कारभाराचा फटका गावाच्या विकासाला बसत असून अनेक महत्त्वाची कामे कागदावरच अडकून पडली आहेत. काही ठिकाणी चुकीच्या जागेची निवड करून निधी खर्च करण्यात आला; मात्र कामे अर्धवट अवस्थेतच बंद पडली आहेत. परिणामी, ग्रामस्थांना अपेक्षित सुविधा मिळण्याऐवजी निधी व वेळ दोन्ही वाया जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस नियोजन करून रखडलेल्या कामांना गती देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT