इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी नगर परिषदेचे माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट जिल्हाध्यक्ष नितीन अशोकराव जांभळे (वय 41) यांचे रविवारी दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण वस्त्रनगरी व परिसराला मोठा धक्का बसला असून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. माजी आमदार अशोकराव जांभळे यांचे ते सुपुत्र होत.
जांभळे यांना चक्कर आल्याने त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. निधनाची बातमी समजताच अलायन्स हॉस्पिटल परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शवविच्छेदनसाठी त्यांना तातडीने इंदिरा गांधी रुग्णालयात पाठविण्यात आले. इंदिरा गांधी रुग्णालयात ज्येष्ठ नेते सर्वपक्षीय राजकीय नेते यांनी अंत्यदर्शन घेतले तसेच इचलकरंजीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
रविवारी सायंकाळी 7 वाजता त त्यांची अंत्ययात्रा काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. नितीन जांभळे यांनी अल्पावधीतच नगरसेवक, बांधकाम सभापती अशा अनेक जबाबदाऱ्या अतिशय कुशलतेने सांभाळल्या होत्या. त्यांनी संघटन कौशल्य देखील अगदी मजबूत केलं होतं. वस्त्र नगरी व परिसरातील संपूर्ण युवा वर्ग त्यांचा शब्द आदराने मानत होता.
इतकेच नाही तर इचलकरंजीच्या सध्या सुरू असणाऱ्या पाणी प्रश्नावर त्यांनी विशेष भूमिका घेत प्रचंड आक्रमकपणा त्यांनी स्वीकारला होता. आणि त्या दृष्टीने ते कार्यरत होते. एखाद्याला शब्द देणे आणि त्याचवेळी त्याचे काम पूर्ण करून देणे हा त्यांचा मोठा गुण प्रत्येकाच्या परिचयाचा होता. नुकताच त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची धुरा देखील सांभाळली होती. नितीन जांभळे यांच्या निधनाने संपूर्ण वस्त्र नगरीवर मोठी शोककळा पसरली असून शहरातील सर्वच राजकीय नेते व कार्यकर्त्यां सह परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. विकास नगर डेक्कन चौक जवाहर नगर शहापूर परिसर तसेच इचलकरंजीतील अनेक ठिकाणचे व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.
हेही वाचा