Kolhapur Navdurga 2025  
कोल्हापूर

Kolhapur Navdurga 2025 | गोष्ट नवदुर्गांची; पूर्वी कोल्हापूरचे रक्षण करणाऱ्या या नवदुर्गा आता कुठे आहेत?

Kolhapur Navdurga 2025 | नवरात्रौत्सवानिमित्त या नवदुर्गाची माहिती देणारी ही मालिका आजपासून...

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

शारदीय नवरात्रौत्सवात कोल्हापुरातील नवदुर्गा दर्शनासाठीही भाविकांची मोठी गर्दी होते. या नवदुर्गाचे विशिष्ट महत्त्व असून पूर्वी कोल्हापूरच्या वेशीवर असलेल्या या नवदुर्गा रक्षणकर्त्या होत्या. आता ही मंदिरे शहराच्या मुख्यकक्षेत आली आहेत. अंबाबाई मंदिराप्रमाणेच या नवदुर्गाचेही स्थान अढळ आहे. नवरात्रौत्सवानिमित्त या नवदुर्गाची माहिती देणारी ही मालिका आजपासून...

मुक्तांबिका (मुकांबादेवी)

मंगळवार पेठेतील साठमारी भागात वसलेले मुकांबा देवीचे मंदिर हा मोक्ष आणि मुक्तीचा दरवाजा मानला जातो. 'मुक्तांबिका' या नावातच तिचे सामर्थ्य आहे. संकटाच्या काळात ही देवी भक्तांच्या हाकेला धावून येते, रोग-बाधा दूर करते आणि जीवनाला नवचैतन्य देते अशी आख्यायिका आहे. विवेकानंद आश्रमाजवळील या मंदिरात नवरात्रात भक्तांची प्रचंड गर्दी होते. भजन, कीर्तन, आरती आणि देवीची महाआरती असे विधी होतात.

पद्मांबिका (पद्मावतीदेवी)

मंगळवार पेठेत जयप्रभा स्टुडिओजवळील पद्मांबिका देवीचे मंदिर म्हणजे शुद्धता आणि संपन्नतेचा झरा. कमळासारखी निर्मळ, उजळ आणि सुंदर अशी ही देवी सौभाग्याचा आशीर्वाद देणारी आहे. गृहस्थांच्या आयुष्यात सौख्य, वैभव आणि समृद्धीची भर घालणारी माता म्हणून पद्मावतीची ख्याती आहे. नवरात्रात दररोज खास महाआरती, शारदीय | उत्सव आणि भाविकांच्या ओढीने मंदिर परिसर फुलून जातो.

एकांबिका (एकविरादेवी)

कोल्हापूरच्या आझाद चौकाजवळील कॉमर्स कॉलेज परिसरात एकांबिका म्हणजेच एकवीरा देवीचे मंदिर. संकटात सापडलेल्या भक्तांना दिशा देणारी, मेहनती विद्यार्थ्यांना यशाचा आशीर्वाद देणारी, व्यापाऱ्यांना उन्नतीचा मार्ग दाखवणारी ही जागृत माता आहे. लोकमान्य टिळकांसारख्या थोर पुरुषांनी ज्या देवीसमोर माथा टेकवला, तीच ही एकविरा. नवरात्रात एकवीरा देवी मंदिर परिसर आरती आणि भाविकांच्या श्रद्धेने उजळून निघतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT