

कोल्हापूर : आपल्याकडे वैद्यकीय शिक्षण खात्याचा कार्यभार येताच त्या क्षणापासूनच कोल्हापुरातील सामान्य माणसांसाठी काय करता येईल, याचा विचार केला. आज वैद्यकीय उपचार महागच नव्हे, तर सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यापलीकडे गेले आहेत. प्रत्येक व्यक्तीला पुण्या-मुंबईला जाऊन वैद्यकीय उपचार घेणे परवडणारे नाही. त्यामुळे तेच उपचार येथे सरकारी दवाखान्याच्या माध्यमातून कसे उपलब्ध करून देता येतील, याचा विचार केला. कोल्हापुरात छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल व राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून आज अत्याधुनिक उपकरणांसह सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल करता आले, याचे आपल्याला सर्वाधिक समाधान आहे. सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्याचे भाग्य मिळाले, यापेक्षा आणखी काय पाहिजे, अशा शब्दांत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या भावना बोलून दाखविल्या.
छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल व राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीतील अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुविधा व विकासकामांबाबत हसन मुश्रीफ बोलत होते. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार दवाखाना म्हणजेच सी. पी. आर. हा 1885 मध्ये बांधलेला दवाखाना. हा सबंध जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांचे हे आधारस्थान. या दवाखान्यासाठी 100 कोटींहून अधिक निधी आणला आणि या दवाखान्याला नवसंजीवनी दिली. तसेच शेंडा पार्कमध्ये प्रचंड गतीने उभारणी सुरू असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीसाठी 1,275 कोटी एवढा निधी आणला.
या वैद्यकीय नगरीतील निव्वळ तीन हॉस्पिटलची उभारणी हजार कोटींहून अधिक निधीमध्ये होईल. तसेच वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय व परिसरातील सेवा, सुविधा व सुधारणा यासाठी एक हजार कोटींहून अधिक निधी खर्च होईल. लवकरच या सर्व गोष्टी पूर्ण झाल्यानंतर दोन हजार कोटींहून अधिक निधीतून साकारलेले हे एक परिपूर्ण आरोग्य संकुल होईल. लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना अनेक सर्वसामान्य कुटुंबांतील माणसं आजारपणातील मदतीसाठी भेटत होती. त्यांची गेली 30-35 वर्षे निरंतरपणे वैद्यकीय सेवा मी करीतच आलो आहे. दरम्यान, गंभीर आजाराचे जे रुग्ण साधारणतः 25 ते 30 माझ्याकडे दर आठवड्याला येतात, त्यांना मी मुंबईला घेऊनच जात असतो; परंतु गंभीर आजारांच्या रुग्णांची ही संख्या वाढल्यास त्यांना मुंबईला घेऊन जाणं, अॅडमिट करणं, उपचार करणं, त्यांची आणि नातेवाईकांची राहण्याची सोय करणं या सगळ्याबाबत मलाही मर्यादा आहेत; परंतु जे माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, अशा सगळ्या रुग्णांची सेवा व्हायची असेल, तर या सगळ्या वैद्यकीय सेवा सुविधा कोल्हापुरातच निर्माण व्हायला हव्यात, या भावनेने हे सगळं काम करीत गेलो, असेही मुश्रीफ म्हणाले.
विधी व न्याय खात्याची जबाबदारी जेव्हा आपल्याकडे सोपविण्यात आली तेव्हा राज्यात ट्रस्ट अॅक्टखाली नोंदणी झालेली धर्मादाय हॉस्पिटल्स आहेत. तिथे सर्वसामान्य कुटुंबातील गोरगरीब रुग्णांसाठी दहा टक्के बेड राखीव ठेवून त्यांच्यावर मोफत उपचार अगदी मोफत व्हावेत, अशी शासनाची अपेक्षा होती. सरकारने ट्रस्टला जमीन, एफ. एस. आय., टी. डी., पाणी, वीज या सगळ्या सवलती दिल्या आहेत. तसेच; सगळे टॅक्स यामध्ये इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स, वॅट, जी. एस. टी., कस्टम ड्युटी माफ केले आहेत. हे मोठमोठे दवाखाने सवलती घेत होते परंतु; गोरगरिबांवर मोफत उपचार करीत नव्हते. त्या पार्श्वभूमीवर विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहांची समिती नेमली. मी अध्यक्ष झालो आणि पाहणी केली. रुग्णांची संख्या आणि ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणारे बेड्स हे गणितही जुळत नव्हते. त्यामुळे यावर कायमस्वरुपी तोडगा काढला. त्यानंतर आता अशा प्रत्येक दवाखान्यात केला तर तुम्हाला दिसेल की, गरीब आणि अतिगरीब रुग्णांसाठी वेगळे काउंटर उभे केले आहेत. गोरगरीब रुग्णांसाठीची किती बेड भरलेले आहेत किती बेड शिल्लक आहेत, यासाठी डॅशबोर्ड सुविधा निर्माण केली आहे.
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी आपल्यावर सोपविण्यात आली. त्यातूनच सरकारी दवाखान्यात या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर सामान्यांची सोय होईल. मोठ्या महानगरात त्यांना वैद्यकीय उपचारासाठी त्यांना जावे लागणार नाही. या सोयी जर येथेच उपलब्ध करून दिल्या तर ते अधिक सोयीचे होईल. त्याचा विचार केला व छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल आणि शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी येथे या सुविधा उपलब्ध करून देत असल्याचे मुश्रीफ म्हणाले. शेंडा पार्कमध्ये आत्ता 650 बेड्सचे जनरल हॉस्पिटल, 250 बेड्सचे सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल जिथे यकृत प्रत्यारोपण, हृदय प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपण, मेंदूवरील सर्व प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, सांधेरोपण, हृदय व पोटविकाराच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होणार आहेत. त्याचबरोबर 250 बेड्सचे स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटल होत असून कॅन्सरवरील उपचारासाठी रुग्णांना कोल्हापूरबाहेर जावे लागणार नाही, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न 100 विद्यार्थी क्षमतेचे बी. एस. स्सी. नर्सिंग महाविद्यालयही मंजूर झाले आहे. सुशिक्षित व कौशल्यपूर्ण मनुष्यबळाच्या दृष्टीने याचा फार मोठा फायदा आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये होईल. सर्वसामान्यांची सेवा हा एकच दृष्टिकोन समोर ठेवला. कोलापूर बरोबरच सीमाभाग व कोकणातील रुग्ण मोठ्या संख्येने येथे येतात. त्यांची सोय करणे, त्यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांना बरे करून घरी पाठविणे यातच आपल्याला आनंद असल्याचे सांगून मुश्रीफ म्हणाले की, सर्वसामान्यांचे दुःख दूर करण्याची संधी साक्षात परमेश्वरानेच आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. यापेक्षा अधिक काय सांगणार?
राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीसाठी एकूण 1 हजार 275 कोटी रुपयांचा निधी आणू शकलो, याचे मोठे समाधान असल्याचे सांगून हसन मुश्रीफ म्हणाले, या नगरीत जी तीन हॉस्पिटल्स उभारण्यात येणार आहेत, त्यासाठीच एक हजार कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. वैद्यकीय व नर्सिंग महाविद्यालय परिसरातील सुविधांवर येत्या काळात सुमारे एक हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च होईल. हा परिसर सर्व सोयींनी सुसज्ज होईल, तेव्हा दोन हजार कोटी रुपये खर्च झालेले असतील, असेही मुश्रीफ म्हणाले.