Narsinhwadi Gram Panchayat dispute  Pudhari
कोल्हापूर

Kolhapur News | नृसिंहवाडी ग्रामपंचायतीत खडाजंगी; कर सवलतीच्या निर्णयावरून ग्रामस्थ आक्रमक

विरोधकांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शाब्दिक चकमकींमुळे वातावरण तणावपूर्ण

पुढारी वृत्तसेवा

Narsinhwadi Gram Panchayat dispute

नृसिंहवाडी : नृसिंहवाडी ग्रामपंचायतीने बोगस ग्रामसभा दाखवून मनमानीपणे केवळ घरफाळा करात सवलत दिली आहे. मात्र, शासनाच्या आदेशानुसार पाणीपट्टीसह इतर करात देखील सवलत देऊन ग्रामस्थांना दिलासा द्यावा. यासाठी पुन्हा ग्रामसभा घेऊन योग्य निर्णय करावा, अशी मागणी संजय शिरटीकर यांच्यासह ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली. या विषयावरून मोठा वादंग निर्माण झाला असून विरोधकांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकींमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.

ग्रामपंचायतीने १० डिसेंबररोजी विशेष ग्रामसभेची नोटीस काढली होती. मात्र या नोटीशीची माहिती न देता ग्रामस्थांच्या खोट्या सह्या दाखवून कोरम पूर्ण करण्यात आला; मात्र प्रत्यक्षात ग्रामसभाच झाली नाही. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी मनमानीपणे पाणीपट्टी करात सवलत नाकारली आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे. यावर ग्रामपंचायत अधिकारी हेमंत कोळी यांनी ग्रामसभा झाली असून पाणीपुरवठा योजनेचा खर्च तोट्यात असल्याने पाणीपट्टी कराबाबत निर्णय झाला नसल्याचे सांगितले.

मात्र, ग्रामसभा झाली असल्यास प्रोसिडिंग का दाखवत नाहीत? असा सवाल उपस्थित केला. संजय शिरटीकर, विकास पुजारी, विनोद पुजारी, गुरुदास खोचरे यांनी प्रश्नांची सरबत्ती करीत खोट्या ग्रामसभेचा निर्णय अमान्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ग्रामपंचायतीने नफा तोटा पाहण्यापेक्षा ग्रामस्थांचे हित लक्षात घ्यावे. पाणीपुरवठा योजना ग्रामस्थानी वर्गणी काढून पूर्ण केली आहे. यामुळे पाणीपट्टी सवलतीचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. याबाबत तातडीने योग्य न झाल्यास वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुकुंद पुजारी, रामचंद्र कुंभार, अमोल विभूते, विकास कदम, सुरेश गवंडी, राजू पुजारी, उदय शिरटीकर, गुरु रिसबूड, अविनाश निकम, पिटू पुजारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

पदाधिकारीच गायब

कर सवलतीच्या संदर्भात ग्रामस्थ निवेदन घेऊन ग्रामपंचायतीत आले असताना सत्ताधारी सदस्य फिरकलेच नाहीत. सरपंच चेतन गवळी यांनी बाहेर असल्याचे कारण सांगून अधिक बोलण्यास टाळले. महत्वाच्या विषयावर सत्ताधारी बोलतच नाहीत, यावरून विरोधक आक्रमक झाले होते.

शासनाने कर सवलतीचा निर्णय घेतला असतानाही ग्रामपंचायत हुकूमशाहीपणे कारभार करीत आहे. अनावश्यक कामांसाठी ग्रा.पं. फंडाची उधळपट्टी करण्यापेक्षा ग्रामस्थांना सवलत देऊन दिलासा द्यावा.
- संजय शिरटीकर, अध्यक्ष, राष्ट्रीय पेयजल योजना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT