Kolhapur-Mumbai Air Travel
कोल्हापूर विमानतळाचा विस्तार प्रगतिपथावर आहे रात्रीच्या विमान उड्डाणाची सुविधाही उपलब्ध झाली. तथापि, कोल्हापुरातून सुटणार्‍या विमानसेवेचे दर सर्वसामान्यांनाच काय, तर धनिकांच्या खिशालाही परवडणारे नाहीत. Kolhapur-Mumbai Air Travel
कोल्हापूर

कोल्हापूर-मुंबई विमान प्रवास मुंबई-दुबईपेक्षा महाग!

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाचा विस्तार प्रगतिपथावर आहे रात्रीच्या विमान उड्डाणाची सुविधाही उपलब्ध झाली. तथापि, कोल्हापुरातून सुटणार्‍या विमानसेवेचे दर सर्वसामान्यांनाच काय, तर धनिकांच्या खिशालाही परवडणारे नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. काही वर्षांपूर्वी केंद्र शासनाच्या उडान योजनेतून कोल्हापूर ते मुंबई 3 हजार रुपयांमध्ये होणारा हा प्रवास आता तब्बल 14 हजार रुपयांवर पोहोचला आहे.

विशेष म्हणजे या दरापेक्षा परदेश दौराही स्वस्त असल्यामुळे या सुविधांच्या परिपूर्ण वापरासाठी विमानसेवेच्या दरावर काही नियंत्रण आणता येते का, यावर गांभीर्याने विचार करावा लागेल; अन्यथा कोल्हापूकरांच्या दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेली विमानसेवा उपलब्ध झाली, पण महागलेल्या तिकिटामुळे प्रवास करता येत नाही, अशी स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. देशात विमानसेवेचे दर हे दैनंदिन बदलत असतात. मागणी व पुरवठ्याचे संतुलन पाहून विमान कंपन्या दर वाढवतात; पण कोल्हापूर ते मुंबई या अवघ्या एक तास पाच मिनिटांच्या प्रवासासाठी 12 हजार 499 रुपये अधिक कर असे तिकीट 11 जुलैसाठी ऑनलाईन दाखवत होते. याउलट मुंबई ते दुबई (अबुधाबी) या 1 तास 40 मिनिटे प्रवासासाठी विमान शुल्क 8 हजार 158 रुपये इतके होते, तर 6 तास 10 मिनिटांचा मुंबई ते अंदमान (पोर्टब्लेअर) हा प्रवास 9 हजार 991 रुपये तिकिटात शक्य होता. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई ते पोर्टब्लेअर या प्रवासासाठी विस्तारा ही टाटा समूहाची प्रीमिअर सेवा उपलब्ध आहे. या सेवेअंतर्गत भोजनासह अन्य सुविधांचाही समावेश आहे.

याखेरीज मुंबई ते व्हिएतनाम (हनोई) या चार तासांच्या प्रवासासाठी एअर इंडिया व व्हिएतनाम एअरलाईन्स या दोन्हीही विमान कंपन्यांनी 14 हजार 25 रुपयांत प्रवास उपलब्ध करून दिला आहे; मग कोल्हापूर ते मुंबई प्रवास इतका महाग का, असा सवाल आता प्रवाशांतून उपस्थित होत आहे.

कोल्हापूरला विमानसेवेचा पाया छत्रपती राजाराम महाराज यांनी घातला. या विमानतळावरील धावपट्टीला मर्यादा असल्यामुळे छोट्या विमानांची उड्डाणे काही महिन्यांपूर्वीपर्यंत शक्य होती. विमानतळाच्या विस्तारीकरणाची, धावपट्टीची लांबी वाढवण्यासाठी आणि रात्री विमानाच्या उड्डाणाची व्यवस्था व्हावी, याकरिता कोल्हापूरकरांनी विशेषतः उद्योजकांनी ही मागणी लावून धरली होती. या गोष्टी पूर्ण होण्यासाठी 25 वर्षांचा कालावधी लोटला. उडान योजनेंतर्गत 3 हजार रुपयांमध्ये प्रवास उपलब्ध झाल्याने कोल्हापुरातून बेंगलोर, तिरुपती, हैदराबाद, अहमदाबाद या मार्गांवर विमानांची उड्डाणे होऊ लागली. तिकिटे वेटिंग लिस्टवर जाऊ लागली. उडान योजनेंतर्गत विमान सेवेचे तिकीट आणि रेल्वेच्या प्रथम वर्गाचे तिकीट सारखेच असल्यामुळे रेल्वेच्या प्रथम वर्गातून प्रवास करणार्‍या प्रवाशांनी विमानसेवेला पसंती दिली. आता सुविधा उपलब्ध झाल्या आणि उडान योजनेचे कवच दूर झाल्यामुळे विमान प्रवास महागला आहे.

उडान योजनेची मुदत वाढविण्यासाठी आग्रहाची गरज

हा प्रवास सामान्यांच्या आवाक्यात येण्यासाठी राज्यकर्त्यांनी कोल्हापूरच्या विमानतळ विकासासाठी लागलेला प्रदीर्घ कालावधी लक्षात घेऊन उडान योजनेची मुदत वाढविण्यासाठी आग्रह धरला पाहिजे; अन्यथा प्रवाशांनी पाठ फिरवली, तर प्रवाशांअभावी विमानसेवा बंद होईल आणि त्याचा फटका विमान प्रवासाचे स्वप्न पाहणार्‍या कोल्हापूरकरांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

SCROLL FOR NEXT