कोल्हापूर

कोल्हापूर : वणवे लागणार… होरपळ होणार… प्रतिबंधाचे काय? धामणी खोऱ्यातील वनसंपदेच्या संवर्धनासाठी उपाययोजना आवश्‍यक

मोहन कारंडे

म्हासुर्ली; पुढारी वृत्तसेवा : दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत चालला आहे. पाण्याचे स्त्रोत आटत आहेत. वातावरणातील गारवा कमी होवून जीवांची तगमग वाढत चालली आहे. नजरेला नितळ गारवा देणारे डोंगर दुरून हिरवेगार दिसत आहेत मात्र यातील गवत वाळून गेले आहे. कोणतरी कृतघ्न वृत्तीचे लोक येतील व या वाळलेल्या गवतात ठिणगी टाकतील. हिच ठिणगी वणव्याच्या रुपाने आख्खा डोंगर कवेत घेइल. समृद्ध वनसंपदेचा भाग म्हणून ओळख असणाऱ्या धामणी खोऱ्यात अजून जरी नसली तरी दरवर्षी प्रमाणेच वणव्यांची मालिका चालू होईल. पण याला अटकाव होण्यासाठी वनविभागाकडून कडक निर्बंध आणून वेळीच जनजागृती करणे गरजेचे आहे.

वनविभागाने राखीव जंगलातील वृक्षतोडीवर तसेच वन्यजीवांच्या शिकारीवर कडक निर्बंध घातले आहेत. काटेकोर अंमलबजावणीमुळे नियमांची दहशत इतकी आहे की, अशा अपप्रकारांना चांगलाच आळा बसला आहे. मात्र दरवर्षी डोंगरांना लागणारे वणवे रोखण्यात वनविभागाला म्हणावे तसे यश लाभलेले नाही. एकीकडे वनविभाग वनांच्या, वन्यजीवांच्या संवर्धनासाठी झटत असले तरी वणव्यांमुळे वनसंपदेचा होणारा ऱ्हास चुकलेला नाही. वणव्यांमुळे वन्यजीवांची तगमग होतेच तर नवीन अंकूरलेली दुर्मिळ झाडांची रोपेही यात जळून खाक होत असतात. याचा परिणाम विस्तारणाऱ्या जंगलांच्या वाढीवर नक्कीच होत आहे.

पश्चिम घाटमाथ्यावरील उंच डोंगर रांगांत विस्तारलेल्या धामणी खोऱ्यातील हेच डोंगर उन्हाळ्याच्या मध्यावर महिनामहिनाभर धुमसत असतात. दुरुन ज्वाळांची माळ दिसत असली तरी प्रत्यक्ष ठिकाणी आगीचे मोठमोठे लोट उठत असतात. पण याच डोंगरांत स्वच्छंदी, मुक्तपणे वावरणाऱ्या वन्यजीवांची वणव्यामुळे तगमग होते, होरपळ होते यात जीवाच्या आकांताने पळणारे प्राणी जखमी होण्याचे प्रमाणही अधिक असते काही व्याकुळलेले प्राणी पाण्याच्या शोधात नदी भागात येत शेतवडींत आसरा घेतात वणव्यांमुळे डोंगरातील सुरक्षित अधिवासच काही काळासाठी असुरक्षित बनल्याने माणवी वस्तींकडे येणाऱ्या प्राण्यांच्या अस्तित्वाचा पुन्हा प्रश्न निर्माण होतो.
या परिसरातील डोंगरभाग म्हणजे दुर्मिळ जातीच्या झाडांबरोबर औषधी वनस्पतींचा खजिनाच म्हणून गणला जातो. मात्र या दुर्मिळ झाडांच्या नविन रोपांबरोबर औषधी वनस्पती आगीत भस्मसात होवून जातात. याचा परिणाम विस्तारणाऱ्या जंगलांवर होत असून काही ठिकाणी दाट झाडीचे जंगल तर काही ठिकाणी विरळ झाडीच्या मोकळ्या डोंगरांचे भकास रूप नजरेस येते.

वनविभाग जंगलांच्या संवर्धनासाठी अधिकाधिक दक्ष जरी असले तरी पर्यावरणावर परिणाम करणारे वणवे रोखण्यासाठी वणवा लावणाऱ्यांचा छडा लावण्यात मात्र त्यांना अपयश येत आहे. वणव्यांचे दुष्परिणाम त्यातून पर्यावरणाची होणारी हाणी याबरोबरच आजच्या काळात माणवी जीवन सुसहय बनण्यासाठी झाडांचे महत्व या बाबी लोकांच्या मनावर बिंबवणे गरजेचे असून कठोर नियमांबरोबर याविषयी लोकांत जनजागृती करणे गरजेचे आहे.

काही लोक पुन्हा गवत चांगले यावे या मानसिकतेतून स्वतःच्या हद्दीत वणवे लावतात. डोंगरात जाणारे हे वणवे रोखण्यासाठी जाळरेषा आखली असली तरी मुद्दामपणे काही लोक डोंगरांच्या हद्दीत आग टाकतात. याच लोकांत जनजागृतीसाठी शाळा, कॉलेज, ग्रामपंचायत या ठिकाणी माहिती देवून जनजागृतीची मोहिम हाती घेणार आहे.
– विश्वास पाटील, वनपाल म्हासुर्ली वनपरिक्षेत्र

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT