कोल्हापूर

कोल्हापूर: अंबप येथील दोन एकरातील आंब्याची बाग वाळली; लाखोंचा फटका

अविनाश सुतार


कासारवाडी: अंबप (ता. हातकणंगले) येथील सुशिल व संदीप घेवारी बंधुंच्या दोन एकर क्षेत्रातील आंब्याच्या बागेतील सुमारे १ हजार झाडे रोग व केडीच्या प्रादुर्भावाने वाळून गेली आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा फटका बसला आहे. आज (दि.३०) सकाळी कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे पीक रोग शास्त्रज्ञ डॉ. रविंद्र कारंडे, डॉ. अभयकुमार बागडे यांनी बागेची पाहणी केली.

सुशील घेवारी व संदीप घेवारी हे दोघेही उच्चशिक्षित तरुण आहेत. सुशीलने कृषी पदविका घेऊन आपली वडिलोपार्जित शेती करण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही नोकरीच्या मागे न धावता जमिनीत नवीन पद्धतीने फळबागांची लागवड केली. यांच्या गट नंबर ४५४ या क्षेत्रावर ८२ गुंठ्यांत हापूस, केशर, वनराज, आम्रपाली अशा विविध १ हजार २०० आंब्याचे रोपांची सहा वर्षांपूर्वी लागवड केली.

पाणी देण्यासाठी सहा बोअर खोदल्या. लागवड करुन रोपांची देखभाल पहिल्या तीन वर्षात करताना सुमारे आठ लाख रुपयांचा खर्च झाला होता. तीन वर्षापासून त्यांना उत्पादन मिळायला सुरू झाले होते. पहिल्या वर्षी १ लाख तर मागील वर्षी दोन लाखाचे उत्पादन सुरू झाले होते. मे २०२३ मध्ये आंबा पूर्ण बहरात आला असताना पाने गळू लागली. जून महिन्यापासून झाडे सुकू गेली. याची माहिती मिळताच कृषी सहाय्यक मनीषा गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी शेखर सुळगावकर, तालुका कृषी अधिकारी अभिजीत गरदे यांनी पाहणी केली. आमदार राजूबाबा आवळे यांनीही भेट दिली.

पावसाच्या अनियमितपणामुळे पाण्याचे व्यवस्थापन न झाल्यामुळे बुरशीजन्य किडींचा प्रादुर्भाव होऊन झाडे वाळली असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास येते.

– डॉ. रविंद्र कारंडे, पीक रोग शास्त्रज्ञ, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर

अनेक वर्षाची मेहनत वाया गेली आहे. प्रसंगी कर्ज काढून फळबाग फुलवली होती. नुकतेच उत्पादन सुरू झाले होते. यामुळे आमच्या कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

-सुशील घेवारी, शेतकरी, अंबप

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT