कोल्हापूर

कोल्हापूर : ‘मुदाळतिट्टा वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी भुयारी मार्ग करा’

अविनाश सुतार


मुदाळतिट्टा : प्रस्तावित नागपूर – गोवा मार्गाला तीर्थक्षेत्र आदमापूर जोडले जाणार आहे. त्यामुळे या तीर्थक्षेत्राला येणाऱ्या भाविकांमध्ये मोठी वाढ होणार आहे. सध्या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान, गोवा या राज्यातून भाविक दर्शनासाठी येत आहेत. काही परदेशी पर्यटक या तीर्थक्षेत्राला भेट देत आहेत. त्यामुळे भाविकांची अमाप गर्दी या ठिकाणी होत आहे. यामुळे मुदाळतिट्टा हा कायमस्वरूपी वाहतुकीच्या कोंडीत अडकला आहे. याचा प्रचंड त्रास भाविकांबरोबरच प्रवासी वर्गाला होत आहे. यावर उपाय म्हणून गारगोटी- कोल्हापूर मार्गावर उड्डाणपूल होणार अशी चर्चा सुरू आहे. उड्डाणपूल ऐवजी निपाणी- राधानगरी, गारगोटी – कोल्हापूर मार्गावर मुदाळतिट्टा या ठिकाणी भुयारी मार्ग तयार केल्यास वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल. याचबरोबर निढोरी मुदाळतिट्टा कालवा मार्ग डांबरीकरण करून वाहतुकीस उपलब्ध करून दिल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल.

मुदाळतिट्टा हे ठिकाण राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर या तालुक्यांना जोडणारे महत्त्वाचे आहे. कर्नाटकाला तळ कोकणाला जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग या ठिकाणाहून जातो. त्यामुळे येथे कायम वाहतुकीची कोंडी होते. यावर मार्ग काढण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. मुदाळतिट्टा अतिक्रमण मुक्त करण्यात आले. येथे असणारे बस स्थानक काढण्यात आले. मुदाळतिट्टा या चौकातूनच बाळूमामाच्या दर्शनासाठी जावे लागते. त्यामुळे वाहनांच्या प्रचंड रांगांच्या गर्दीत मुदाळतिट्टा आपले अस्तित्व हरवून जातो.

त्यामुळे मुदाळतिट्टा येथे गारगोटी – कोल्हापूर मार्गावर उड्डाणपूल उभारण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. पण उड्डाणपूल उभारू नये, अशी मागणी येथील सर्व व्यावसायिकांनी केली आहे. तर उड्डाणपुलाला पर्याय म्हणून आदमापूर सरवडे व बिद्री- मुदाळ दरम्यान असणाऱ्या उंचवट्याखाली भुयारी मार्ग काढता आला, तर मुदाळतिट्ट्याचे अस्तित्व अबाधित राहील. व वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायमचा निकालात येईल, यासाठी या भुयारी मार्गाचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांतून होत आहे.

याचबरोबर मुदाळतिट्टा- निढोरी दरम्यान असणाऱ्या दूधगंगेच्या कालव्यावर एका बाजूने रस्त्याचे डांबरीकरण करून जर मुदाळतिट्टा- निढोरी- मुरगूड- कागल अशी पर्यायी वाहतूक सुरू केली. तर, बाळूमामाच्या यात्रावेळी आदमापूर येथे होणारी वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल. सध्या अमावस्येवेळी निढोरी- सोनाळी- बिद्री अशी वाहतूक सुरू असते. कालवा मार्ग तयार केल्यास वाहतुकीचा मोठा प्रश्न मार्गी लागेल.

 मुदाळतिट्टा या ठिकाणी होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीवर भुयारी मार्ग हाच एक पर्याय आहे. मुदाळ – बिद्री- आदमापूर- सरवडे या चारही बाजू मुदाळतिट्टा पेक्षा सखल भागात आहेत. त्यामुळे सध्या येथून भुयारी मार्ग करणे सहज सोपे आहे. त्यामुळे येथे भुयारी मार्गाचा शासनाने विचार करावा.

– ज्योतीराम सूर्यवंशी, व्यावसायिक मुरगूड

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT