कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी पक्ष आणि नेत्यांकडे आग्रही भूमिका घेणे हे नेहमीचेच असते. मात्र गेल्या काही वर्षांत न झालेल्या निवडणुका आणि इच्छुकांची वाढलेली संख्या यामुळे आता कुटुंबा कुटुंबांत उमेदवारीसाठी वाद रंगत आहेत. अर्थात याचे प्रमाण ग्रामीण भागात जास्त असले, तरी शहरी भागातही त्याची लागण झाल्याने त्यामुळे तुमच्यातील वाद मिटवा आणि मग आमच्याकडे या, असे सांगण्याची वेळ नेत्यांवर आली आहे
कोणाला द्यायची, असा पेच असतो. निवडणूक कोणतीही असली, तरी एका जागेसाठी इच्छुकांची संख्या अधिक असते. त्यामुळे एकाला उमेदवारी देताच इतर इच्छुक नाराज होतात, हे स्पष्ट आहे. अलीकडेच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्याबाबतची भावना बोलून दाखवली. नगरपालिका, जिल्हा बँका या निवडणुका आल्या की छातीत धडधडतय, असं म्हणत मन मोकळेपणाने नेत्यांची अवस्था सांगून टाकली.
आता एकाच जागेसाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेतच. मात्र एकाच कुटुंबात अनेकांनी उमेदवारीसाठी आग्रही भूमिका घेतल्याने कुटुंबात वाद होत आहेत. यापूर्वी राजकारणातील अनेक मातब्बर घराण्यात दोन पिढ्यांतील वाद चव्हाट्यावर आले आहेत. कधी त्याचा फटका ज्येष्ठांना बसला, तर कधी ज्येष्ठांनी आपणच राजकारणात वस्ताद असल्याचे सिद्ध केले.
उमेदवारी मागणारे घराणे नेत्याशी एकनिष्ठ असल्यामुळे दोन पिढ्यांकडून उमेदवारी मागितली असताना नेमका निर्णय काय घ्यायचा, याचा पेच नेत्यांसमोर आहे. त्यामुळेच आता नेत्यांनीही उमेदवारीसाठी पहिल्यांदा तुमच्या घरातील वाद मिटवा. तुमच्यापैकी कोण लढणार, ते मला सांगा मग बघू, असा पवित्रा घेतला आहे. एकाच घराण्यातील दोन पिढ्यांतील उमेदवारांच्या दाव्यांमुळे नेते अक्षरशः हैराण झाले आहेत.
आताही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी घरातच दोन पिढ्यांत होत असलेला संघर्ष पहायला मिळत आहे. जुनी पिढी थांबायचं नाव घेत नाही आणि नवी पिढी ऐकत नाही, अशी अवस्था आहे. यामध्ये नेत्यांचा कोंडमारा होत आहे.