कासारवाडी : सादळे-मादळे (ता. करवीर) येथील ग्रामसभेत सोमवारी (दि.२५) जोरदार खडाजंगी झाली. दारूबंदीची अंमलबजावणी, तसेच सरपंचांच्यावर अविश्वास ठराव, यावरून ग्रामसभेत घोषणाबाजी, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी सभागृह दणाणून गेले. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने काही ग्रामस्थ व महिलांनी ग्रामपंचायतीच्या दाराला टाळे ठोकण्याचा थरारक प्रयत्न केल्याने गावात क्षणभर तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
ग्रामपंचायत समोरील मारुती मंदिराच्या सभागृहात ग्रामसभा झाली. ग्रामसभेतील अध्यक्ष पदाच्या निवडीवरूनच सभेत गोंधळ सुरू झाला. अजेंड्यावरील विषय झाल्यानंतर ऐनवेळीच्या विषयात ग्रामसभेत दारूबंदीबाबत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. गावात अवैद्य दारू विक्री व बिअर बारला ना हरकत दाखल्यावरून सभेत खडाजंगी होऊन वाद हमरीतुमरीवर गेला. यावेळी परवाना दिला नसल्याचे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सरपंच असक्षम असल्याने सरपंचांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचा विषय माजी ग्रामपंचायत सदस्य अमीर पटेल यांनी मांडला. यावरून सभा अधिकच पेटली. सभेचे अध्यक्ष व ग्रामसेवकांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला मात्र असमाधानी ग्रामस्थांनी गावात दारूबंदी झालीच पाहिजे, सरपंच अकार्यक्षम, अशा घोषणाबाजी केली.
अविश्वास ठराव व दारूबंदी यावरुन वाद चिघळताच कांही युवकांनी व महिलांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. यावरून वातावरण अधिकच तापले. पोलिसांनी धाव घेत मध्यस्थी करत ग्रामस्थांना शांत केले.
ग्रामसभा तणावपूर्ण होत असताना ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे वारंवार फोनवर बोलण्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. व फोनवर बोलण्यास मज्जाव केला.
सरपंच मानसिक व शारीरिक दृष्ट्या कार्यभार सांभाळण्यास सक्षम असून त्यांच्या नावाखाली बोगस सह्या करून इतर काही व्यक्ती कारभार करतात. शिवाय गावातील दारू विक्रीमुळे मारामाऱ्या होत आहेत.अमिर पटेल, माजी ग्रामपंचायत सदस्य