कोल्हापूर

कोल्हापूर : कासारी धरण ४५ टक्के भरले; गतवर्षीच्या तुलनेत ७४७ मिलिमीटर कमी पाऊस

मोहन कारंडे

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : १ जूनपासून सुरू झालेल्या कासारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४७ दिवसांत मागील वर्षीच्या तुलनेत सरासरी ७५० मिलिमीटर कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे ०.७६ टीएमसी पाण्याची आवक कमी झाली आहे. धरण सध्या ४५ टक्के भरले असून हाच आकडा गतवर्षी याच दिवशी ७३ टक्के होता. पाणीसाठा कमी असल्याने चिंता वाढली आहे.

कासारी प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता २.७७७ टीएमसी आहे. धरणाची पाण्याची पातळी ६१३.१० मीटर असून उपयुक्त पाणीसाठा ३५.३६ द.ल.घ.मी आहे. सद्यस्थितीत धरणात एकूण १.२६ टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिवशी पाणीसाठा ५७.१८ द.ल.घ.मी इतका होता. तर धरण २.०२ टीएमसी इतके भरले होते. गतवर्षीपेक्षा धरणात २८ टक्के पाणीसाठा कमी आहे. सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णतः बंद करण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात २९ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती पाटबंधारे विभागातून देण्यात आली. मागील काही वर्षांचा इतिहास अभ्यासला असता साधारणतः जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर धरणांतर्गत विभागात अपेक्षित असा दमदार पाऊस पडतो आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस धरण पूर्ण क्षमतेने भरते. एकीकडे असे असले तरी यंदा आजवरचा अत्यल्प पाऊस सर्वांच्याच चिंतेचा विषय बनला आहे.

कासारी धरण पाणलोट क्षेत्रातील सर्वच धरणात पावसाअभावी जून महिन्यात अखेर पाणीसाठा खालावला होता. परिणामी शेतीसाठी उपसाबंदी लागू करायची वेळ आली होती. मात्र जुलै महिन्यातील पावसाने धरणातील साठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. कासारी पाणलोट क्षेत्रात कासारी (गेळवडे) या प्रमुख मध्यम प्रकल्पासह पडसाळी, पोंबरे, नादांरी, कुंभवडे व केसरकरवाडी हे पाच लघु पाटबंधारे प्रकल्प येतात. कासारी मध्यम प्रकल्पामधून शाहूवाडी तालुक्यातील २० गावांना व पन्हाळा तालुक्यातील ४१ गावातील सुमारे नऊ हजार ४५८ एकर सिंचन क्षेत्राला पाणी मिळते. उन्हाळ्यात पाणी अडविण्यासाठी नदीवर जागोजागी कोल्हापूर पद्धतीचे १४ बंधारे आहेत. जून अखेर कासारी धरणात १५ टक्‍क्यांपर्यंत साठा खालावला होता. जुलै महिन्यात झालेल्या पावसाने प्रकल्पात पाण्याची आवक वाढली असून सद्यस्थितीत ४५ टक्के साठा झाला आहे.

शाहूवाडी तालुका आपत्ती निवारण कक्षातून तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात आजअखेर सरासरी ३९५ मिमी तर २४ तासांत १५ टक्के पाऊस बरसला.

मंडलनिहाय २४ तासांत व आजअखेर पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा : 

मंडल                 २४ तासांत         आजअखेर
भेडसगाव               २२.५                 २६६.४
बांबवडे                    २.८                 १६७.४
करंजफेन                 १९                  ५७४.२
सरूड                     ३.३                 १६८.३
मलकापूर               २०.५                 २२७.१
आंबा                     २२.३                ९६८.३
सरासरी                     १५                  ३९५

गेल्या २४ तासांतील कोल्हापूर धरण क्षेत्रातील पाऊस

राधानगरी धरण क्षेत्र- ७८ मिमी
दूधगंगा धरण क्षेत्र- ४८ मिमी
कुंभी धरण क्षेत्र – ३०  मिमी
पाटगाव धरण क्षेत्र- ८० मिमी
कडवी धरण क्षेत्र- ३४ मिमी
तुळशी धरण क्षेत्र- १३ मिमी
कासारी धरण क्षेत्र- २९ मिमी

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT