Kurundwad polling updates
कुरुंदवाड : कुरुंदवाड नगरपरिषद निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल 82.95 टक्के मतदानाची नोंद केली. शहरातील स्थानिक राजकारणातही ही निवडणूक नवे समीकरण घडविणारी ठरणार असल्याचे चित्र आहे. एकूण 22, 224 मतदारांपैकी तब्बल 18,435 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ९,४५९ महिलांनी आणि ८,९७६ पुरुषांनी सक्रिय सहभाग नोंदवत मतदान प्रक्रियेला वेग दिला.
सकाळपासूनच विविध प्रभागांमध्ये मतदारांनी रांगा लावल्याने मतदानाला उत्साहवर्दक सुरुवात झाली. दुपारी 12 वाजेपर्यंत 52.72 टक्के मतदानाची नोंद झाली होती. दहा प्रभागांतील 28 मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार न होता निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. फक्त प्रभाग क्र. 8 मधील मतदान केंद्राबाहेर किरकोळ वादावादीचा प्रसंग घडला. कुरुंदवाड शहरातील विविध केंद्रामध्ये पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड आमदार डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी भेट दिली.
19 एकूणच निवडणूक प्रक्रिया निर्भय व मुक्तपणे शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी मनोज कुमार भिसे व सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रभाग 1 : 2430 पैकी 2188 – 90.04%
प्रभाग 2 : 2222 पैकी 1681 – 75.00%
प्रभाग 3 : 1788 पैकी 1542 – 86.24%
प्रभाग 4 : 2436 पैकी 2001 – 82.14%
प्रभाग 5 : 1755 पैकी 1486 – 84.67%
प्रभाग 6 : 2264 पैकी 1916 – 84.62%
प्रभाग 7 : 2272 पैकी 1882 – 82.83%
प्रभाग 8 : 2461 पैकी 2033 – 82.60%
प्रभाग 9 : 2290 पैकी 1811 – 79.08%
प्रभाग 10 : 2306 पैकी 1895 – 82.17%
दहा प्रभागांमध्ये झालेल्या एकूण मतदानातून नागरिकांनी प्रचंड सहभाग दर्शवला असून, नगरपरिषद निवडणुकीबाबतची जागृती व उत्साह स्पष्टपणे दिसून आला.राजर्षी शाहू आघाडी,काँग्रेस, भाजप तसेच अपक्ष उमेदवार यांच्यात यंदा कडवी स्पर्धा पहायला मिळाली. अनेक प्रभागांत बहुकोणी लढतीमुळे निकाल अधिकच रोमांचक ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकातुन बोलले जात आहे.
मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असली तरी निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार असल्याने उमेदवार, त्यांच्या समर्थक, कार्यकर्ते तसेच नागरिकांमध्ये उत्सुकता आणि तणाव दोन्ही वाढले आहेत.कोणत्या पक्षाचा झेंडा नगरपरिषदेत फडकेल? सत्ता कोणाच्या हातात येईल? कोणत्या प्रभागात कोण बाजी मारेल? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष केंद्रीत झाले आहे.