Kurundwad illegal gas transfer
कुरुंदवाड : शहरासह परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये बेकायदेशीररीत्या ट्रान्सफर करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जादा नफ्याच्या लालसेपोटी सुरू असलेल्या या गैरप्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांना गॅस टंचाईचा सामना करावा लागत असून, याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही गॅस एजन्सींशी संबंधित कर्मचारी मशीनच्या सहाय्याने घरगुती सिलिंडरमधील गॅस काढून तो व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरत आहेत. त्यानंतर हा गॅस बेकरी, खवा व्यवसायिक तसेच काही वाहनधारकांना अधिक दराने विकला जात असल्याचे उघड झाले आहे. मजरेवाडी, बस्तवाड आणि नांदणी रस्त्यालगतच्या शेतजमिनींच्या आडोशात हा व्यवहार गुप्तपणे होत असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकारामुळे केवळ आर्थिक गैरव्यवहारच नव्हे, तर मोठा सुरक्षेचा धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही सुरक्षाव्यवस्थेशिवाय गॅस ट्रान्सफर करण्यात येत असल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधितांकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, एका जागरूक नागरिकाने हा प्रकार गुन्हा असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. “आमच्या मालकांचा तहसीलदार ते कलेक्टर कार्यालयापर्यंत प्रभाव आहे,” असा दावा केल्याचीही माहिती समोर आली आहे. या वक्तव्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत असून, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू आहे.
स्थानिक नागरिकांनी या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच गॅस एजन्सींची कार्यपद्धती, सिलिंडरचा पुरवठा व वितरण प्रक्रिया यांची स्वतंत्र चौकशी करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. अत्यावश्यक वस्तू असलेल्या घरगुती गॅसच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोर धरत आहे.