Kolhapur Kini toll naka Gutkha Seized
पेठवडगाव: पुणे - बंगळूरू महामार्गावरील किणी टोल नाक्यावर अवैधरित्या वाहतूक करण्यात येणाऱ्या ३६ लाखांच्या गुटख्यासह कंटेनर असा ५६ लाख रुपयांचा मुद्देमाल पकडण्याची कारवाई वडगाव पोलिसांनी सोमवारी (दि.२१) रात्री केली.
वडगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक माधव डीघोळे, सहाय्यक फौजदार आबा गुंडणके, महेश गायकवाड, अनिल अष्टेकर हे पुणे बंगळूरू महामार्गावर गस्त घालत असताना त्यांना खबऱ्याकरवी एका कंटेनरमधून मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक करण्यात येत असल्याचे समजले. त्यांनी टोल नाक्यावर टेहळणी सुरू ठेवली. संशयित नंबरशी मिळता जुळता कंटेनर नाक्यावर आला असता त्याला बाजूला घेतले. चालक फतरू पटेल याच्याकडे चौकशी केली असता त्याने कंटेनरमध्ये केमिकलची बॅरल असल्याचे सांगितले. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने कंटेनरमध्ये प्रतिबंधित सुगंधी सुपारी, पान मसाला, सुगंधी तंबाखू असा माल असल्याचे सांगितले.
रात्री हा कंटेनर वडगाव पोलीस ठाण्याच्या आवारात आणून लावण्यात आला. ही घटना जिल्हा अन्न व औषध प्रशासनास कळविण्यात आली. या विभागाचे अधिकाऱ्यांच्या समक्ष या कंटेनरची तपासणी करून पंचनामा करण्यात आला. यात ३६ लाख ३६ हजार ३६ रुपयांची प्रतिबंधित सुगंधी सुपारी, पान मसाला, सुगंधी तंबाखू असा माल आढळून आला. कंटेनरसह ५६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वडगाव पोलीस तपास करत आहेत.