kolhapur Crime News file photo
कोल्हापूर

kolhapur Crime News: अवघ्या ६ दिवसांत ३ खून! कंक खून प्रकरणाच्या तपासात तिसऱ्या हत्येची कबुली

शाहूवाडी येथील कंक दाम्पत्याच्या दुहेरी खून प्रकरणाचा तपास करताना सराईत गुन्हेगार विजय मधुकर गुरव याच्या चौकशीत आणखी एका धक्कादायक खुनाची माहिती समोर आली आहे.

मोहन कारंडे

विशाळगड : सुभाष पाटील

​कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथील कंक दाम्पत्याच्या दुहेरी खून प्रकरणाचा तपास करताना सराईत गुन्हेगार विजय मधुकर गुरव (वय ४०, रा. शिरगांव, ता. शाहूवाडी) याच्या चौकशीत आणखी एका धक्कादायक खुनाची माहिती समोर आली आहे. गुरव याने रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील रायपाटण-टक्केवाडी येथील वैशाली शांताराम शेट्ये (वय ७४) या वृद्ध महिलेचा खून केल्याची कबुली दिली आहे. अवघ्या सहा दिवसांत तीन खून केल्याची ही माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

६ दिवसांत ३ खून : गुन्हेगारीचा थरार

१३ ते १५ ऑक्टोबर : गुरवने राजापूरच्या रायपाटण-टक्केवाडी येथे एकट्या राहणाऱ्या वैशाली शेट्ये यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला. शेट्ये यांनी प्रतिकार केल्यामुळे गुरवने घरातील वरंवट्याने ठेचून त्यांचा निर्घृण खून केला आणि सोने व रक्कम चोरून नेली. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. वैशाली शेट्ये यांच्या खुनानंतर लपण्यासाठी तो शाहूवाडी तालुक्यातील कडवी धरण पाणलोट क्षेत्रातील गोलीवणे वसाहत येथे १६ ऑक्टोबर, सायंकाळी ७ च्या सुमारास आला. येथे त्याने निनू यशवंत कंक (वय ७०) आणि त्यांची पत्नी रखुबाई निनू कंक (वय ६५) या दाम्पत्याचा शाब्दिक वाद झाल्यानंतर चिडून खून केला. कंक दाम्पत्याचे मृतदेह १९ ऑक्टोबर रोजी आढळून आले होते.

​पोलिसांच्या तावडीतून पळाल्याची चर्चा

​विजय गुरव याला २ ऑक्टोबरच्या दरम्यान शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या चौकशीदरम्यान अलंकार हॉल येथील रुममधून तो पळून गेल्याची चर्चा आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी यांनीही याबाबत आरोप केला आहे. कंक दाम्पत्याचा खून केल्यानंतर गुरव पुन्हा रत्नागिरी परिसराकडे गेला होता आणि त्याने तेथे घरफोड्या व मोबाईल चोरी केल्याचेही उघड झाले आहे.

​ रत्नागिरी पोलीस लवकरच ताब्यात घेणार

​कंक खून प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला रायपाटण-टक्केवाडी येथील घटनास्थळाशी संबंधित काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले होते. याच आधारावर केलेल्या चौकशीत गुरवने वैशाली शेट्ये यांच्या खुनाची कबुली दिली.

​कोल्हापूर पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांशी संपर्क साधला असून, येत्या दोन दिवसांत रत्नागिरी पोलीस कोल्हापुरात येऊन सराईत गुन्हेगार विजय गुरवचा ताबा घेणार आहेत.

​स्थानिक गुन्हे अन्वेषणचे कौतुकास्पद यश

पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, राम कोळी, विनोद कांबळे, रुपेश माने, राजेंद्र वरंडेकर, अमित सर्जे यांनी या तिहेरी खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी मोलाची कामगिरी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT