कसबा बीड येथे रस्त्याच्या कडेला पलटी झालेला सिमेंट काँक्रिट वाहून नेणारा डंपर Pudhari
कोल्हापूर

Kolhapur Accident | कसबा बीड येथे सिमेंट काँक्रिटचा डंपर पलटी; अवजड वाहतूक ठप्प

स्त्याच्या एका बाजूला काँक्रिटीकरण आणि दुसऱ्या बाजूला डंपर उलटल्याने परिसरातील अवजड वाहतुकीवर मोठा परिणाम

पुढारी वृत्तसेवा

Kasba Beed Cement Dumper Overturns

शिरोली दुमाला : कसबा बीड येथे शनिवारी (दि. २०) पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास सिमेंट काँक्रिटने भरलेला डंपर रस्त्याच्या बाजूच्या भरावपट्टीवरून पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रस्त्याच्या एका बाजूला काँक्रिटीकरण आणि दुसऱ्या बाजूला डंपर उलटल्याने परिसरातील अवजड वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. तर नियमित वाहन चालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, कसबा बीड परिसरात सुरू असलेल्या काँक्रिट रस्त्याच्या कामासाठी बीडशेड येथील प्लांटमधून सिमेंट काँक्रिटचा माल घेऊन डंपर घटनास्थळाकडे जात होता. यावेळी रस्त्याच्या बाजूच्या भरावावर डंपर रुतून गेल्याने तो लगतच्या चरीत पलटी झाला. या घटनेमुळे घानवडे, शिरोली दुमाला परिसरातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या चारचाकी व अवजड वाहनांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. परिणामी अनेक मोठ्या वाहनांना बीडशेडमार्गे बहिरेश्वर रस्त्याने कोल्हापूरकडे वळसा घालून जावे लागले.

सकाळी या घटनेची माहिती अनेक वाहनचालकांना नसल्याने नेहमीप्रमाणे वाहने या मार्गावर येत होती. मात्र रस्ता बंद असल्याचे समजल्यानंतर वाहनांच्या लांब रांगा लागल्या. अनेक वाहनचालकांनी काही काळ प्रतीक्षा केल्यानंतर मागे फिरून पर्यायी मार्गांचा अवलंब केला. त्यामुळे प्रवासी व वाहनचालकांना अतिरिक्त अंतराचा प्रवास करावा लागला.

दरम्यान, सकाळी सुमारे नऊ वाजल्यानंतर दुसऱ्या ट्रकच्या साहाय्याने पलटी झालेल्या डंपरमधील काँक्रिट माल काढण्याचे काम सुरू करण्यात आले. रस्ता पूर्ववत करण्यासाठी यंत्रणेकडून प्रयत्न करण्यात आले. या घटनेमुळे काही तास परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT