विशाळगड : शाहूवाडी तालुक्यातील 'कासारी' ७१ तर 'कडवी' ८६ टक्के भरले. कडवी नदीवरील ५ तर कासारी नदीवरील १२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कासारी धरणातून नदीपात्रात प्रतिसेकंद ५५० क्यूसेस तर कडवी धरणातून प्रतिसेकंद २०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
कासारीत २.१५ टीएमसी तर कासारी १.९६ टीएमसी धरणात पाणीसाठा आहे. कडवी धरण पाणलोट क्षेत्रात ९० मिमी पाऊस गेल्या ८ तासांत झाला. पावसाचा जोर वाढल्याने कडवी नदीवरील भोसलेवाडी, शिरगाव, येलूर, कोपार्डे, सवते-सावर्डे, सरूड-पाटणे हे पाच बंधारे तर कासारी नदीवरील यवलूज, पुनाळ-तिरपन, ठाणे-आळवे, कांटे, वालोली, बाजारभोगाव, पेंढाखळे, करंजफेन, कुंभेवाडी, सुसकेवाडी, नवलाचीवाडी १, नवलाचीवाडी २ हे १२ बंधारे पाण्याखाली गेले असल्याची माहिती कडवी धरण शाखा अभियंता खंडेराव गाडे व कासारी धरण अभियंता एस आर लाड यांनी दिली. दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.
शाहूवाडी तालुक्यात पावसाचा जोर कायम असून कडवी धरण क्षेत्रात आजअखेर १५८१ मिमी तर कासारी धरण क्षेत्रात २११७ मिलीमीटर पाऊस बरसला. कडवी धरण २.१५ टीएमसी भरले असून पाणी पातळी ५९८.९० मीटर तर पाणीसाठा ६०.८९ दलघमी इतका आहे. कडवी धरणातून प्रतिसेकंद २०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तालुक्यात अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी घरांच्या भिंती पडल्या तर काही ठिकाणी कौले व पत्रे उडून नुकसान झाले आहे. काही भागात झाडे कोलमडून पडली आहेत. विशाळगड परिसरात दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. कासारी धरण ७०.८९ टक्के भरले असून धरणात १.९६ टीएमसी पाणीसाठा संकलित झाला आहे.