Youth Attacked In Karveer Kolhapur
कोल्हापूर : विसर्जन मिरवणुकीत आपल्या घरासमोर फटाक्यांची माळ कोणी लावली, असा जाब विचारण्यावरून झालेल्या वादातून तिघांनी २२ वर्षीय तरुणावर कोयत्याने हल्ला केला. ही धक्कादायक घटना केर्ले पैकी मानेवाडी (ता. करवीर) शुक्रवारी रात्री घडली. या हल्ल्यात तरुणाच्या मानेवर कोयत्याचा वार झाला असून, डोक्यात दगड मारण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार करण्यात आले असून, मानेवर सहा टाके पडले आहेत. सुदैवाने तो थोडक्यात बचावला.
या प्रकरणी संग्रामसिंह दत्तात्रय माने, रणजीत दत्तात्रय माने आणि दत्तात्रय कृष्णा माने या तिघांविरोधात करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मानेवाडी येथे गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना ‘आमच्या दारात फटाक्यांची माळ कोणी लावली?’ अशी विचारणा करत तिघा संशयितांनी तरुणाशी वाद घातला.
वाद वाढल्यानंतर संग्रामसिंह माने, रणजीत माने आणि दत्तात्रय माने यांनी तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर त्याच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. कोयत्याचा वार मानेवर झाल्याने तरुण जखमी झाला. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड मारण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, वाद वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर विसर्जन मिरवणुकीतील मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत तिघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त तिघांनी त्यांचेही म्हणणे न ऐकता हल्ला केल्याचे सांगण्यात आले.
हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या मानेवर सहा टाके घालण्यात आले असून, डोक्यालाही दुखापत झाली आहे.
या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी तिन्ही संशयितांविरोधात करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. यातील संग्रामसिंह माने हा सरकारी नोकरदार असल्याची माहिती समोर आली आहे.