Bhartiya Dalit Mahasangh
कळे : कळे-गगनबावडा रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून रस्त्याच्या दुरवस्थेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीने सोमवारी (दि. २४) कळे पोलीस ठाण्यासमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी कळे-गगनबावडा रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधत राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच कळे पोलीस ठाण्यात मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता एस. व्ही. रासने आणि कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम यांनी निवेदन स्वीकारले.
सोमवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कळे पोलीस ठाण्यासमोर जमले. यावेळी ‘कळे-गगनबावडा रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा’, ‘अधिकाऱ्यांचा निषेध असो’, अशा घोषणा देत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी श्रीकांत कांबळे यांनी, कळे-गगनबावडा रस्त्याची तातडीने दुरुस्ती न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला. आंदोलनामुळे कळे-गगनबावडा मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कळे पोलिसांनी आंदोलनस्थळी बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत केली.
या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे, गणेश कांबळे, सावळा कांबळे, दयानंद कांबळे, बबलू चौगले, उदय पवार यांच्यासह भारतीय दलित महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.