Kagal taluka Pimpalgaon Khurd lake issue
सिध्दनेर्ली: पिंपळगाव खुर्द (ता. कागल) येथील पाझर तलावाशेजारी होणाऱ्या प्रस्तावित होमिओपॅथिक महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या बांधकामाला असलेला तीव्र विरोध आता प्रशासनाच्या दरबारात पोहोचला आहे. सोमवारी संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या 'लाँग मार्च'ची दखल घेत, जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले होते. याच आदेशाच्या अनुषंगाने, कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी कुलदीप बोंगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि पाणलोट क्षेत्राचे अधिकारी यांच्यासह पथकाने पिंपळगाव खुर्द येथे भेट दिली.
यावेळी प्रशासकीय पथकाने बांधकामाच्या प्रस्तावित जागेची पाहणी करण्यासाठी गावात दाखल होताच, ग्रामस्थांनी त्यांना घेराव घातला. तलावाचे महत्त्व आणि भविष्यात पर्यावरणावर होणारे संभाव्य गंभीर परिणाम लक्षात घेऊन, गावकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सदर दवाखाना आणि महाविद्यालयाची जागा तातडीने बदलण्याची विनंती केली. गावकऱ्यांनी एकमुखी भूमिका मांडत, हा प्रकल्प पिंपळगावमध्येच व्हावा, यास आपला कोणताही आक्षेप नाही, मात्र तो तलाव शेजारी न घेता गावातील किंवा परिसरातील अन्य सुयोग्य गट नंबरमध्ये स्थलांतरित करावा, अशी मागणी लावून धरली.
दुसरीकडे, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. सदर दवाखाना येथे झाल्यास तलावाला किंवा पर्यावरणाला कोणतेही तोटे होणार नाहीत, हे तांत्रिक दृष्ट्या पटवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, संतप्त ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी केवळ तोंडी चर्चा न करता, आलेल्या सर्व अधिकाऱ्यांना संपूर्ण तलावाच्या परिसरात नेले आणि जागेची वास्तविक स्थिती दाखवून दिली. पाण्याची पातळी, पाणलोट क्षेत्र आणि तलावाचे स्थानिक महत्त्व स्पष्ट करून, त्यांनी हा दवाखाना इतर गट नंबरमध्ये हलवावा या मागणीवर जोर दिला.
यावेळी गावकरी आणि अधिकारी यांच्यादरम्यान शाब्दिक झुंबड उडाली होती. एका बाजूला प्रशासकीय अधिकारी शासकीय नियमांचा आणि तांत्रिक बाबींचा आधार घेत होते, तर दुसऱ्या बाजूला ग्रामस्थ तलावाचे संरक्षण आणि भविष्यातील पिढीचे हित या भावनिक आणि पर्यावरणीय मुद्द्यांवर ठाम होते. प्रशासकीय पाहणीनंतरही गावकऱ्यांचा विरोध कायम राहिला असून, आता जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यलय यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.