विशाळगड : शाहूवाडी तालुक्यातील कडवी मध्यम प्रकल्प ९५ टक्के भरला असून लवकरच तो 'ओव्हर फ्लो' होण्याच्या मार्गावर आहे. २.५१ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेला हा प्रकल्प कडवी खोऱ्यातील २२ गावांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरला आहे.
कडवी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवक वेगाने होत आहे. गेल्या २४ तासांत ९८ मिमी पावसाची नोंद झाली, तर आजअखेर एकूण १५८० मिमी पाऊस बरसला आहे, जो गतवर्षीच्या याच दिवसाच्या ११४४ मिमी पावसापेक्षा ४३६ मिमी अधिक आहे. सध्या धरणाची पाणीपातळी ५९९.८९ मीटर असून, त्यात ६५.१५ दलघमी पाणीसाठा आहे. धरणातून सध्या विद्युत गृहातून प्रतिसेकंद २४० क्युसेक पाण्याचा विसर्ग कडवी नदीत सुरू आहे. यामुळे कोपार्डे, भोसलेवाडी, शिरगाव हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत आणि नदीकाठची पिकेही बाधित झाली आहेत. कडवी धरण शाखा अभियंता खंडेराव गाडे यांनी नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कडवी पाणलोट क्षेत्रातील मानोली, कासार्डे, कांडवन, पालेश्वर हे चारही लघु पाटबंधारे प्रकल्प यापूर्वीच ओव्हर फ्लो झाले आहेत.
यावर्षी मे महिन्यात मान्सूनपूर्व व मान्सून पावसाने धरण क्षेत्रात दमदार हजेरी लावली. गतवर्षीपेक्षा धरणात अधिक पाणीसाठा आहे. गतवर्षी धरण २२ जुलै रोजी 'ओव्हर फ्लो' झाले होते.