

कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या तब्बल तीन वर्षांनी होणार्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदारसंघ जाहीर करण्यात आले. जिल्ह्यात नव्याने झालेल्या नगरपरिषदा व नगरपंचायती मतदारसंघात (गट व गण) फेरबदल झाले आहेत. जुन्या मतदारसंघातील काही गावे वगळण्यात आली असून, काही गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. आता या गावांच्या बेरीज, वजाबाकीचा फायदा कोणाला आणि फटका कोणाला बसणार याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या प्रारुप मतदारसंघावर हरकती घेण्यासाठी गावागावांतील नेत्यांनी व प्रमुख कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
जिल्हा परिषदेच्या गेल्या सभागृहाची मुदत मार्च 2022 रोजी संपली. तेंव्हापासून जिल्हा परिषद, पंचायत समितींमध्ये प्रशासक राज सुरू आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबल्या होत्या. परंतु, न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यामुळे सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितींचा पहिला नंबर लागला. सोमवारी प्रारूप मतदारसंघाची यादी जाहीर करण्यात आली.
गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी काहींना नगरपरिषदेचा, तर काहींना नगरपंचायतींचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामध्ये हातकणंगले, हुपरी, आजरा, चंदगड या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे हे मतदारसंघ जिल्हा परिषदेच्या गटातून वगळण्यात आले आहेत. त्यांची नावे जिल्हा परिषदेत यापुढे दिसणार नाहीत. परंतु, त्याचा परिणाम त्याला लागून असलेल्या मतदारसंघातील गावांवर झाला आहे. याशिवाय वाढलेल्या मतदारसंख्येमुळे करवीर तालुक्यातील शहरालगतच्या काही मतदारसंघात बदल झाला आहे. हातकणंगलेमुळे शिरोळ तालुक्यातीलही काही मतदारसंघात बदल झाला आहे.
या प्रारूप मतदारसंघाच्या यादीवर हरकत घेण्यासाठी आता नेत्यांनी आपली यंत्रणा गतिमान केली आहे. हे करत असतानाच नव्याने गावे समावेश झालेल्या मतदारसंघातील इच्छुकांना फेरजुळणी करावी लागणार आहे.
जिल्ह्यातील साधारणपणे आठ तालुक्यांतील जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात कमी-अधिक प्रमाणात बदल झाला आहे. यामध्ये काही मतदारसंघातील गावे वगळण्यात आली आहेत, तर काही मतदारसंघात नवीन गावांचा समावेश करण्यात आला आहे. यातून गेल्या सभागृहातील काही पदाधिकार्यांचे मतदारसंघही सुटले नाहीत. मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये मतदारसंघात झालेल्या या वजाबाकीचा आणि बेरजेचा फटका कोणाला बसणार याची चर्चा सुरू झाली आहे.