कोल्हापूर : न्यायालयीन कामासाठी गेल्या दहा-बारा वर्षापासून मुंबईला कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील हेलपाटे मारणार्या पक्षकारांच्या चेहर्यावर सोमवारी वेगळाच आनंद दिसत होता. प्रत्येकवेळी मुंबईला जाऊन वकीलांना भेटणार्या पक्षकारांना आपले वकील आपल्या गावाजवळ भेटू लागल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यासाठी पुर्वी कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील पक्षकारांना रात्री मुंबई गाठावी लागे. प्रवासाचा खर्च, मुक्कामाचा त्रास, न्यायालयातील गडबड, वेळेचा अपव्यय यामुळे त्यांचे मानसिक व शारीरिक हाल होत होते.
तसेच प्रत्येक वेळी आपल्या वकिलांना भेटण्यासाठी मोठ्या खर्चिक व त्रासदायक प्रवासाचा सामना करावा लागत असे. पण आता आपल्या जिल्ह्याजवळ वकील उपलब्ध होणार असल्यामुळे या त्रासातून पक्षकारांची सुटका झाली आहे. सर्किट बेंच सुरू झाल्यामुळे केवळ वेळ आणि पैसा वाचणार नाही, तर न्याय मिळवण्याचा प्रवासही अधिक सुलभ होणार आहे. यामुळे पक्षकार समाधान व्यक्त करण्याबरोबरच कोल्हापुरात सर्किट बेंच सरू करण्याचे हे एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे सांगत होते. सर्वसामान्य माणसाला मुंबईला फेर्या मारणे आर्थिकदृष्ट्या खूप खर्चिक होते.