Shirol Taluka Ration Card Notice
जमीर पठाण
कुरुंदवाड : शासनाच्या " मिशन सुधार योजनेअंतर्गत" आयकर भरणाऱ्या तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम लाभार्थ्यांना स्वस्त धान्य योजनेचा लाभ बंद करण्याची प्रक्रिया शिरोळ तालुक्यात सुरू झाली आहे. पुरवठा विभागाकडून आतापर्यंत 2 हजार 868 रेशन कार्डधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून माहितीची पडताळणी करून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पुरवठा नायब तहसीलदार वैशाली माळी यांनी दिली.
शासनाकडून अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. आयकर विभागाकडून प्राप्त माहितीनुसार संबंधित लाभार्थ्यांची पडताळणी केली जात असून अनेक लाभार्थी आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही शासनाच्या धान्य योजनेचा लाभ घेत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना नोटिसा बजावून स्पष्टीकरण मागविण्यात येत आहे.
पुरवठा विभागाकडून लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याचे कामही सुरू असून पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ सुरळीतपणे मिळावा, हा उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
केसरी रेशन कार्डधारक : २७ हजार ५३७
प्राधान्य कुटुंब लाभार्थी कार्ड : ५७ हजार ३००
अंत्योदय लाभार्थी कार्ड : ४ हजार ५२३
पांढऱ्या शिधापत्रिका : ५ हजार ४१९
नोटिसा बजावलेले कार्डधारक : २ हजार ८६८