कोल्हापूर

कोल्हापूर : जालन्यातील लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ बांबवडेत कडकडीत बंद; रस्ते पडले ओस

backup backup

बांबवडे; पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्याची अर्थवाहिनी असणाऱ्या बांबवडे बाजारपेठेत मंगळवारी (ता. ५) दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमार घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाने केलेल्या आवाहनाला सर्वच घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामुळे एरवी कमालीची वर्दळ अनुभवणारे शहरातील प्रमुख रस्ते ओस पडल्याचे चित्र पहायला मिळाले.

बांबवडे शहर व्यापारी असोसिएशनने घाऊक व किरकोळ दुकाने दिवसभर कुलूपबंद ठेवल्यामुळे दैनंदिन कोट्यवधीची उलाढाल आणि त्याअनुषंगाने होणारे दळणवळणही ठप्प झाले होते. दवाखाने, औषधालये अशा अत्यावश्यक सेवा वगळता ज्वेलर्स असोसिएशन, फळ-भाजीपाला विक्रेते, खाजगी प्रवासी वाहतूकदार संघटना, फेरीवाले आदी सर्व घटक बंदमध्ये सहभागी झाले होत्या. साहजिकच या प्रमुख बाजारपेठेने बंदमुळे शुकशुकाट अनुभवला.

दरम्यान, आंदोलनाच्या धसक्याने मलकापूर आगार प्रशासनाने सर्वच रस्त्यावरील बसफेऱ्या थांबविल्याने लाल परीची चाके अघोषित काळ आगारातच थांबली आहेत. याचा विद्यार्थी, सामान्य प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बांबवडे लगतच्या डोणोली गावतील दैनंदिन व्यवहार कडकडीत बंद ठेऊन जालना येथील मराठा समाजावरील लाठीहल्ला घटनेचा ग्रामस्थांनी निषेध नोंदविला.

दरम्यान, दिवसभर कडकडीत बंद पाळून मराठा समाजाला पाठिंबा दिल्याबद्दल अ. भा. मराठा महासंघाचे अध्यक्ष सुनिल पाटील यांनी बांबवडेवासीय व्यापारी तसेच सर्व घटकांप्रति आभार व्यक्त केले. बांबवडेत बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमित पाटील, सचिन पांढरे यांनी शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्याचबरोबर तालुक्यातील प्रमुख मार्गावर पेट्रोलिंगही सुरूच ठेवण्यात आले आहे.

सरूड येथे बुधवारी सर्व व्यवहार बंद !

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणस्थळी घुसून मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ला घटनेच्या निषेधार्थ सरूड (ता. शाहूवाडी) येथे बुधवारी (ता. ६) दिवसभर व्यापारासह सर्व आर्थिक देवघेव व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, या बंद काळात दवाखाने, औषधे, दूध या अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. अशी माहिती सरपंच भगवान नांगरे-पाटील यांनी दिली आहे. होणाऱ्या एक दिवसीय बंद बाबत ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन शाहूवाडीचे तहसीलदार तसेच पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे. मराठा समाजावरील अन्यायाविरुद्ध होणारा हा बंद यशस्वी करण्याचे आवाहनही सरपंच नांगरे-पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT