Ichalkaranji Corporation Municipal  Pudhari
कोल्हापूर

Ichalkaranji News | इचलकरंजी महापालिकेचे भाजप नगरसेवक योगेश पाटील यांचा जातीचा दाखला रद्द

जात पडताळणी समितीचा निर्णय, नगरसेवकपदाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह, उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची योगेश पाटील यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

BJP Corporator Yogesh Patil Caste Certificate Cancelled

इचलकरंजी : इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३-ब मधील इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षित जागेवरून निवडून आलेले भाजपचे नगरसेवक योगेश चांगदेव पाटील यांचा जात प्रमाणपत्राचा दाखला कोल्हापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केला आहे. समितीच्या या निर्णयामुळे त्यांच्या नगरसेवकपदाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, इचलकरंजीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजी उत्तम शिंदे यांनी तक्रार दाखल केली होती. महानगरपालिका निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर शिंदे यांनी योगेश पाटील यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर आक्षेप घेत कोल्हापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दाद मागितली होती.

योगेश पाटील यांनी जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सादर केलेली कागदपत्रे दिशाभूल करणारी असून, त्यामध्ये विसंगती असल्याचा दावा तक्रारदार शिवाजी शिंदे यांनी केला होता. यासंदर्भातील पुरावेही त्यांनी समितीसमोर सादर केले होते. या तक्रारीच्या अनुषंगाने समितीने संबंधित कागदपत्रे आणि पुराव्यांची तपासणी केली. त्यानंतर योगेश चांगदेव पाटील यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, समितीच्या निर्णयानंतर नगरसेवक योगेश पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आपण आवश्यक ती योग्य कागदपत्रे सादर केली आहेत. त्यामुळे जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

समितीच्या या निर्णयामुळे योगेश पाटील यांच्या नगरसेवकपदावर काय परिणाम होणार, तसेच उच्च न्यायालयात याप्रकरणी काय निर्णय होणार, याकडे आता इचलकरंजीतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT